प्रफुल्ल पटेल विमान घोटाळा प्रकरणी अडचणीत

नवी दिल्ली, दि.२२ – विमान खरेदी घोटाळा प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल चांगलेच अडचणीत आलेत. कॅगने ताशेरे ओढल्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने त्यांना चांगलाच दणका दिला आहे. त्यामुळे पटेलांच्या अडचणीत भर पडणार आहे.

कोळसा घोटाळ्यामुळे काहीसे दुर्लक्षित असलेले विमान खरेदी घोटाळा प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या फटकार्‍याने पुन्हा चर्चेत आले आहे. कोर्टाने प्रफुल्ल पटेलांच्या विरोधातील एका याचिकेवर सुनावणी करताना केंद्र सरकार आणि केंद्रीय दक्षता आयोगास नोटीस बजावली आहे. विमान खरेदी प्रकरणात तत्कालीन नागरी हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेलांची सीबीआय चौकशी का करण्यात येवू नये. असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने केंद्रीय दक्षता आयोगास केला आहे. पटेल नागरी हवाई वाहतूक मंत्री असताना १११ विमाने ६७ हजार कोटी रुपयांना घेतली होती. यामध्ये घोटाळा झाला असून त्यासंदर्भात कॅगनेही ताशेरे ओढलेत. असे कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

विमान खरेदी प्रकरणाबरोबरच विमाने भाड्याने देणे, फायद्यातल्या मार्गांवर विमान न चालवण्याबद्दलही ते आरोपांच्या फेर्‍यात अडकलेत. कोर्टाच्या नोटीसीला केंद्र आणि सीबीसी काय उत्तर देते याकडं सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment