पाकिस्तानमधील हिंसक निदर्शनात २३ ठार,२२९ जखमी

इस्लामाबाद, दि.२२ – पाकिस्तानध्ये इस्लाम विरोधी चित्रपटाच्या विरोधात निदर्शने करणार्‍या आंदोलनात २३ जण ठार झाले आहेत. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा अवमान करणार्‍या एका चित्रपटावरुन सध्या अरब जगतामध्ये निदर्शने सुरु आहेत. पाकिस्तानमध्ये शुक्रवारी झालेल्या निदर्शनामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत.

इस्लामाबादप्रमाणेच कराचीमध्ये देखील निदर्शने करण्यात आली यामध्ये दोन पोलिसांसह १७ जणांचा मृत्यू झाला. तर पेशावरमध्ये झालेल्या निदर्शनामध्ये सह जणांचा मृत्यू झाला. देशभरात झालेल्या हिंसक निदर्शनामध्ये २००हून अधिक जण जखमी झाले आहेत. हिंसक जमावाने कराचीमध्ये तीन चित्रपटगृहांना, तीन सरकारी कार्यालयांना, तीन बँकांना आणि अनेक पोलिस गाड्यांची जाळपोळ केली आहे.

इस्लामविरोधी चित्रफितीविरुद्ध जगभरातील मुस्लिम राष्ट्रामध्ये निदर्शने करण्यात येत आहेत. अमेरिकेने युट्यूवरुन ही चित्रफित काढावी, अशी मागणीसुद्धा करण्यात येत आहे. पाकिस्तान सरकारने अमेरिकी दुतावासाचे अधिकारी रिचर्ड होगलँड यांच्याकडे तशी मागणीही केली आहे. पाकिस्तानमध्ये उसळलेल्या हिंसाचारामध्ये आतापर्यंत २२९ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. कराची, लाहोर आणि इस्लामाबादसह १५ शहरांमधील मोबाईलसेवा कालपासून बंद ठेवण्यात आली आहे. मोबाईलच्या मदतीने दहशतवादी बॉम्बस्फोट करण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

Leave a Comment