जगातील सर्वात महागडा पोशाख!

लंडन – महागतला महाग ड्रेस किती रुपयांचा असेल असा तुमचा अंदाज आहे? तीस कोटी रुपयांचा पोशाख असू शकतो यावर तुमचा विश्वास बसतोय का? नसेल तर हे वाचा.

एका ब्रिटीश डिजाइनरने तयार केलेला  काळ्या रंगाचा  पोशाख जगातील सर्वात महागडा पोशाख आहे. किंमत आहे सुमारे ३५ लाख पौंड (सुमारे ३० कोटी ८० लाख रुपये) . या अत्यंत मौल्यवान पोशाखात ५० कॅरेटचे दोन काळे हीरे आहेत. १३ किलो वजन असलेल्या हा पोशाख ब्रिटिश डिजाइनर डेबी विंघमने तयार केला आहे. द टेलीग्राफच्या वृत्तानुसार यूक्रेनमध्ये एका फॅशन शोवेळी परिधान करण्यात आलेला हा पोशाख जगातील सर्वात महागडा पोशाख आहे. फॅशन शोदरम्यान विंघमने इतर अनेक पोशाखही सादर केले.

शोमध्ये या महागड्या पोशाखाबाबत लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या. शोदरम्यान उपस्थित एका दर्शकाने सांगितले की, हा पोशाख परिधान करणार्‍या व्यक्तीतही तार्‍यांप्रमाणे चमक असायला हवी. मात्र एवढा महागाडा पोशाख तयार केल्याबद्दल काहींनी खेदही व्यक्त केला.