अष्टविनायक मंदिरे –भाग १

भारतात जशी शंकराची बारा ज्योतिर्लिंगे प्रसिद्ध आहेत तसेच महाराष्ट्रातील अष्टविनायक भाविकांच्या मनात एक वेगळेच स्थान मिळवून आहेत. हिंदू धर्मात कोणतेही कार्य करण्याअगोदर गणेशाला वंदन करूनच सुरू केले जाते. तो विघ्नहर्ता, सुखकर्ता, दुःखहर्ता आणि मंगलमूर्ती आहे. त्यामुळेच कोणत्याही छोट्या मोठ्या गावांत जा, तेथे गणपती मंदिर असणारच. देशात कांही गणपती मंदिरे वैशिष्ठ्यूपूर्णही आहेत मात्र अष्टविनायकानी आपले एक वेगळेच महत्त्व सिद्ध केले आहे. हे अष्टविनायक स्वयंभू आहेत म्हणजे या मूर्ती निसर्गानेच निर्माण केलेल्या आहेत असा समज आहे तसेच हे सर्व विनायक जागृत म्हणजे भाविकांना पावणारे आहेत असाही विश्वास भाविकांत आहे. अष्टविनायकांची ही स्थाने महाराष्ट्रातील पुणे, नगर आणि रायगड अशा तीन जिल्ह्यातच आहेत. अनेक भाविक अष्टविनायकाची यात्रा करत असतात. मात्र या यात्रेचे कांही नियम आहेत. त्यानुसार मोरगांवच्या मयुरेश्वराचे प्रथम दर्शन घ्यावे लागते. त्यानंतर सिद्धटेक, पाली, महड, थेऊर, लेण्याद्री, ओझर, रांजणगांव व परत मोरगांव अशा क्रमाने ही यात्रा केली तरच ती शास्त्रशुद्ध होते.
mayureshwar-temple
मोरगांवचा मयुरेश्वर-
अष्टविनायकातील पहिला गणपती म्हणजे मोरगावचा मयुरेश्वर. पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील कर्‍हा नदीच्या काठी वसलेल्या मोरगांव या छोट्याशा गावांत हे मंदिर असून दूरून एखाद्या किल्ल्याप्रमाणे हे मंदिर दिसते. मयुरेश्वर म्हणजे मोरावर आरूढ झालेला. गणपतीचे वाहन मूषक असले तरी हा गणपती मोरावर विराजमान आहे. तीन डोळे असलेली ही मूर्ती बैठी असून डाव्या सोंडेची आहे. गणपतीच्या डोळ्यात व नाभीत मौल्यवान रत्ने बसविलेली आहेत. डोक्यावर नागराजाची फडा आहे. दोन्ही बाजूस रिद्धी सिद्धींच्या मूर्ती आहेत. मूर्तीवर शेंदूराचे कवच असल्याने मूर्ती मोठी वाटली तरी प्रत्यक्षात छोटी आहे. दर १००-१५० वर्षांची हे कवच निघते.
mayureshwar-temple1
मंदिरात मुख्य दाराने प्रवेश केला की प्रथम भव्य दिपमाळ आहे, नगारखाना आहे. मंदिरात गेल्यावर दिसतो दगडी मूषक किवा उंदीर. याने पुढच्या दोन पायात लाडू पकडलेला आहे. पायर्‍या चढून वर गेल्यानंतर दिसतो भव्य नंदी. असे सांगतात की येथून जवळच असलेल्या शिवमंदिरात नेण्यासाठी हा नंदी बैलगाडीतून नेला जात होता मात्र मयुरेश्वराच्या मंदिरासमोर आल्यावर गाडी मोडली आणि नंदी खाली पडला. त्यानंतर अनेक जणांनी उचलूनही हा नंदी हलेनाच. रात्री गाडीवानाच्या स्वप्नात हा नंदी आला आणि त्याने याच मंदिरात त्याला राहायचे असल्याचे सांगितले. त्यामुळे गणपतीमंदिरातच नंदी बसविण्यात आला.
mayureshwar-temple2
हे मंदिर बिदरच्या बादशहाच्या दरबारात असलेले सरदार गोळे यांनी बांधल्याचे दाखले आहेत. मात्र मोगली आक्रमणापासून सुरक्षा मिळावी म्हणून दूरून मशिदीचा भास व्हावा अशा पद्धतीने हे मंदिर बांधले गेले आहे. मंदिराला चार दरवाजे असून पूर्व दरवाजात लक्ष्मीनारायण, पश्चिम दरवाज्यात रती आणि काम, दक्षिण दरवाजात शिवपार्वती तर उत्तरेच्या दरवाजात पृथ्वी आणि सूर्य आहेत. मंदिराच्या आठ कोपर्‍यात आठ गणपती असून ते एकदंत, महोदर, गजानन, लंबोदर, विघ्नराज, धुम्रवर्ण, वक्रतुंड या स्वभाववैशिष्ट्यांनी युक्त आहेत. मंदिरात शमी, मंदार आणि तराटीचा वृक्ष असून तराटीला कल्पवृक्ष असेही म्हटले जाते. याच झाडाखाली बसून ध्यानधारणा केली जाते. मयुरेश्वराचे दर्शन घेण्याअगोदर नंगा भैरव दर्शन घेण्याची प्रथा असून मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या या भैरवाला गुळ, नारळाचा नैवैद्य दाखविला जातो.

पुण्यापासून ५५ किमीवर असलेल्या मोरगांवात पूर्वी मोर मोठ्या संख्येने होते असे सांगतात तसेच या गणपतीची मूर्ती प्रत्यक्ष बह्माने बसविली होती असाही समज आहे. सध्याच्या मूर्तीमागे तांब्याच्या कवचात वाळू, लोखंड आणि हिरे यांच्या चूर्णातून बनविलेली मूर्ती पांडवांनी बसविलेली आहे असेही सांगितले जाते.

Leave a Comment