नवी दिल्ली/कोलकाता, दि.२१ – ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या सहा मंत्र्यांनी अखेर आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे आपापल्या पदाचे राजीनामे दिले. तृणमूलच्या मंत्र्यांनी पंतप्रधानांची त्यांच्या ’७, रेसकोर्स रोड’ या निवासस्थानी भेट घेत राजीनामे सादर केले. त्यानंतर तृणमूल काँग्रेसचे सर्व १९ खासदार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रपती भवनात दाखल झाले. यूपीए सरकारला आमच्या पक्षाने दिलेला पाठिंबा काढत असल्याचे पत्र यावेळी तृणमूलच्या संसदीय पक्षाच्या नेत्याने मुखर्जी यांच्याकडे दिले. त्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या सहा मंत्र्यांचे राजीनामे राष्ट्रपती भवनाकडे सादर केले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही तृणमूलच्या मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. तरीही मनमोहन सिंग यांचे सरकार निश्चिंत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, सरकारकडे पुरेसे संख्याबळ असल्याचे लक्षात येताच गेल्या काही दिवसापासून तिसर्या आघाडीसाठी प्रयत्नशील असणारे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी मनमोहन सिंग यांच्या यूपीए सरकारला आपला बिनशर्त पाठिंबा कायम असल्याचे म्हटले आहे. सपाचा २००९ पासूनच केंद्र सरकारला बाहेरुन पाठिंबा आहे.
केंद्रातील यूपीए सरकारचा पाठिंबा ममतांनी काढल्यानंतर आता काँग्रेसने पलटवार केला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममताच्या तृणमूल काँग्रेसला दिलेला पाठिंबा काँग्रेस पक्षाने काढून घेतला आहे. ममताच्या सरकारमध्ये काँग्रेसचे सहा मंत्री आहेत. ते आज सायंकाळी राजीनामा देत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप भट्टाचार्य यांनी ही घोषणा केली.
भट्टाचार्य म्हणाले, बंगालमध्ये जर एफडीआय आणले गेले नाही, तर राज्याच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होणार आहेत. तृणमूल काँग्रेस एफडीआयच्या भूमिकेबाबत राजकारण करीत आहेत. कारण ममता यांच्या पक्षाने विधानसभेच्या निवडणुकीतील जाहीरनाम्यात रिटेलमधील एफडीआयचा समावेश केला होता. त्यामुळे एफडीआय त्यांना हवेच आहे, पण ममता निव्वळ राजकारण करीत आहेत.
बंगालमध्ये २९४ विधानसभेच्या सभागृहात काँग्रेसचे ४२ आमदार आहेत. त्यातील ममताच्या सरकारमध्ये दोन कॅबिनेट व चार राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. काँग्रेसने जरी ममताच्या सरकारचा पाठिंबा काढला असला, तरी त्यामुळे त्यांना फरक पडत नाही. गेल्या वर्षी बंगालमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने डाव्या पक्षांचा तब्बल ३५ वर्षांनी दणदणीत पराभव करताना २९४ पैकी १८४ जागा मिळवत विजय प्राप्त केला होता.