सैन्यदलांमध्ये अधिकार्‍यांची कमतरता

नवी दिल्ली: भारतीय सैन्यदलात अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर कमतरता असून त्यामुळे व्यवस्थापनात अडथळे निर्माण होत आहेत. सैन्य दलातील जवान आणि अधिकाऱ्यांमध्ये संघर्ष उद्भाविण्याच्या घटनांचे हेच एक प्रमुख कारण आहे; असे भारताचे लष्कर प्रमुख जनरल विक्रम सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

भारतीय लष्करात सध्या १० हजार १०० अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. गुणवंत युवकांना अधिक मोबदला आणि सुखसोई प्रदान करणार्‍या संधींमध्ये झालेली वाढ हे त्यामागचे कारण आहेच. त्याचबरोबर पालक आपल्या पाल्यांना लष्करात जाण्यास करीत असलेला विरोध हेही तरुण लष्करी सेवेत येत नसल्याचे प्रमुख कारण असल्याचे लष्कर प्रमुखांनी स्पष्ट केले. आतापर्यंत तरुणांना लष्करी सेवेकडे आकृष्ट करण्यासाठी अनेक उपक्रमांद्वारे प्रयत्न करण्यात आले. मात्र यापुढे लष्करी सेवेचे महत्व पालकांना पटवून देण्यासाठी लष्कर प्रयत्न करेल; असेही जनरल सिंग म्हणाले. अधिकाऱ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे भरल्या जाणार्‍या पदांची संख्या वाढविण्याबाबत केंद्र सरकारला प्रस्ताव दिल्याचेही त्यांनी सांगितले.

सेनादलात अधिकाऱ्यांची संख्या वाढविण्याचा कोणताही कालबद्ध कार्यक्रम हाती घेणे शक्य नसल्याचे सेना प्रमुखांनी मान्य केले. या समस्येतून घाईने नव्हे तर टप्प्या टप्प्यानेच मार्ग निघू शकेल; असे त्यांचे म्हणणे आहे.

लष्करातील जवानांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्याबरोबरच त्यांना बढतीच्या संधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.