विरोधकांच्या एकजुटीने बंद यशस्वी: गडकरी

नवी दिल्ली: आणीबाणीच्या काळानंतर प्रथमच सर्व विरोधक सरकारच्या विरोधात एकवटल्याने गुरुवारचा ऐतिहासिक भारत बंद पूर्ण यशस्वी झाल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केला.

डीझेल दरवाढ, शिलेदार चे रेशनिंग आणि रिटेल क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीला मान्यता या निर्णयाच्या विरोधात एकत्र येऊन सर्व विरोधकांनी हा बंद यशस्वी केला असून आणीबाणी नंतर प्रथमच सर्व विरोधक एकत्र आल्याने या बंदला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाल्याचे गडकरी यांनी सांगितले. विशेषत: डाव्या पक्षांचे त्यांनी आभार मानले. हा लढा गरिबांच्या हितासाठीचा लढा असून काँग्रेसने सगळ्या घोटाळ्यावर पांघरून घालण्यासाठी आर्थिक सुधारणांच्या नावाखाली जनता विरोधी निर्णय घेतल्याचा आरोप गडकरी यांनी केला.

महाराष्ट्रात शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असलेला विरोध, भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा अनुत्साह या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात; विशेषत: पुण्या- मुंबईत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने पुकारलेल्या बंदला फारसा प्रतिसाद नसला तरी व्यापारी, दुकानदार, रिक्षाचालक आणि वाहतूकदारांचा बंद यामुळे महाराष्ट्रात बंदला अल्प प्रतिसाद आहे. देशभरात मात्र बंदमुळे जनजीवन विस्कळीत झाले.

डीझेल दरवाढ, रिटेल क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला मान्यता आणि सिलेंडरचे रेशनिंग या निर्णयांच्या विरोधात रालोआ आणि डाव्या पक्षांनी गुरुवारी भारत बंदची हाक दिली आहे. महाराष्ट्रात सामान्य नागरिकांमध्ये सरकारच्या धोरणांबद्दल तीव्र असंतोष असूनही बुधवारपासून गणेशोत्सव सुरू झाल्यामुळे बंद मध्ये सहभागी होण्याची सर्वसामान्यांची मानसिकता नाही. त्याच कारणाने आक्रमक आंदोलनासाठी ओळखल्या जाणार्या शिवसेना आणि मनसेने बंद मधून अंग काढून घेतले आहे. एवढेच नव्हे तर पुणे आणि ठाण्यासारख्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी देखील बंदमध्ये सहभागी होण्याचे नाकारले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बंदची धार बोथट झाली आहे.

उर्वरित भारतात; विशेषत: पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि विरोधक सत्तेवर असलेल्या राज्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हा बंद राजकीय पक्षांनी पुकारला असला तरीही इंधन दरवाढीमुळे वाहतूकदार आणि थेट विदेशी गुंतवणुकीमुळे व्यापारी, दुकानदार या बंदमध्ये स्वयंस्फुर्तीने सामील होत आहेत.

Leave a Comment