रिबॉक इंडियाच्या पाच अधिकार्‍यांना अटक

गुरगांव दि.२०-रिबॉक इंडियाचे निलंबित व्यवस्थापकीय संचालक सुबिंदरसिंग आणि माजी सीओओ विष्णू भगत यांच्या सह अन्य तीन अधिकार्‍यांना कंपनीतील ८७० कोटी रूपयांच्या अफरातफर प्रकरण आरोपावरून अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयापुढे रिमांड घेण्यासाठी हजर केले जाणार आहे. संजय मिश्रा, प्रशांत भटनागर आणि सुरक्षित भट्ट अशी अन्य तीन अधिकार्‍यांची नांवे आहेत.

गुरगांव पोलिस उपायुक्त भुपेंदर सिंग यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार या सर्वांवर फ्रॉड, गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे आणि फसवेगिरी या आरोपांवरून भारतीय दंड विधानानुसार आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. भुपेंदर सिंग यांची विशेष तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

रिबॉक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सुबिदरसिंग व सीओओ विष्णू भगत यांनी गेली पाच वर्षे देशभरात बनावट वितरक दाखवून बनावट बिले सादर केली होती. तसेच कंपनीची चार वेअरहाऊस परस्पर भाड्याने दिली होती व गोदामातील माल डिफेक्टीव्ह असल्याचे दाखवून तो परस्पर बाहेर विकला होता. मार्च २०१२ ला प्रथम हा घोटाळा लक्षात आला. ८७० कोटी रूपयांची फसवणूक या दरम्यान करण्यात आली होती. दरम्यान सुबिदर सिंग यांची आदिदासचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून गतवर्षी नेमणूक करण्यात आली होती. त्यांना आणि सीओओ भगत यांना हा घोटाळा उघडीकीस येताच निलंबित करण्यात आले होते. कंपनीचे आर्थिक संचालक शमीम पडथ यांनी अफरातफरीसंदर्भातील तक्रार गुरगांव पोलिसांकडे दाखल केली होती.