देशात गरजेपेक्षा जादा साखर उपलब्ध

पुणे दि.२०- यंदा दुष्काळामुळे प्रमुख साखर उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रातील ऊस उत्पादन ३० टक्के घटले असून साखर उत्पादनही गत वर्षीच्या ९० लाख टनांवरून ६० लाख टनांवर येणार असले तरीही देशात साखरेची चणचण भासणार नाही तर देशाच्या गरजेपेक्षा ४० लाख टन साखर उत्पादन अधिक होईल असे इंडियन शुगर मिल असोसिएशन ने जाहीर केले आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात साखरेचे दर स्थिरच असतील असा विश्वासही व्यक्त केला आहे. सणासुदीचे दिवस तोंडावर असल्याने महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्य जनतेसाठी ही बाब दिलासा देणारी आहे.

महाराष्ट्रात दुष्काळामुळे ऊस उत्पादन घटले असले तरी दुसर्‍या क्रमांकाचे साखर उत्पादक राज्य असलेल्या उत्तरप्रदेशात ऊस पीक जोमाने आलेले आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातही साखरेचे दर मंदीत आहेत. त्यामुळे देशातील साखर स्थानिक बाजारातच विकली जाईल आणि त्याचा परिणाम साखर दर स्थिर राहण्यात होईल असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्रात यंदा ६० लाख टन साखर उत्पादन अपेक्षित आहे मात्र महाराष्ट्राची साखरेची गरज २० लाख टन आहे. जादा साखर देशाच्या अन्य राज्यात पाठविली जाईल. इंडियन शुगर मिल असो.व नॅशनल फेडरेशन ऑप को.ऑप. शुगर फक्टरीज यांनी संयुक्त रित्या हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. देशात ऊस व साखरेची उपलब्धता किती असेल यासाठी ऊसपिकाच्या सॅटेलाईट इमेज ऑगस्टमध्ये घेण्यात आल्या. त्यात ५३.५४ लाख हेक्टर क्षेत्रात ऊस लागवड झाली असून गतवर्षीच्या तुलनेत ती दोन टक्के जादा आहे. प्रत्यक्ष साखर उत्पादन २६२ लाख टन होईल असा अंदाज असून देशाची साखरेची गरज २२० लाख टन इतकी आहे. म्हणजेच ४० लाख टन साखर अतिरिक्त होणार आहे.

महाराष्ट्र स्टेट फेडरेशन ऑफ को.ऑप.शुगर फॅक्टरीचे व्यवस्थापकीय संचालक संजीव बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी राज्यातील ११९ सह.कारखान्यांपैकी २० कारखाने बंद राहण्याची शक्यता आहे. शिवाय राज्यात ५१ खासगी कारखाने आहेत. यंदा ऊस उत्पादन घटल्याने कारखान्यांना गाळपासाठी पुरेसा ऊस नाही परिणामी उत्पादन खर्च वाढणार आहे. अर्थात महाराष्ट्रात उसाचा उतारा चांगला असतो त्यामुळे राज्यात साखरेची टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाही तसेच दरवाढीचीही शक्यता नाही.

Leave a Comment