ममतांचा दणका

ममता बॅनर्जी यांनी केंद्रातल्या काँग्रेस सरकारचा पाठींबा काढून घेतला आहे. आपला पक्ष संपु आघाडीतून सुद्धा बाहेर पडेल, असे त्यांनी जाहीर केले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून सातत्याने जी शक्यता वाटत होती ती आता खरी ठरली आहे. इतके दिवस ममतादीदी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष मनमोहनसिंग यांना केवळ धमकावत होता. ममता बॅनर्जी अधूनमधून काही ना काही तरी निमित्त काढून सरकारला इशारे द्यायच्या. परंतु त्यांनी इशारा दिला की, मनमोहनसिंग त्यांची समजूत घालायचे आणि ममता दिदींची समजूत पटायची. त्यांनी इशारा दिला की, खळबळ माजायची आणि सरकार पडणार की काय, अशी भीती वाटायची. परंतु त्यांची समजूत पटली की खळबळ शांत व्हायची. असे दोन-तीन वेळा घडले आणि प्रत्येक वेळी ममता बॅनर्जी इशारे देऊन शांत बसल्या. लोकांना वाटले त्या उगाच इशारे देत असतात आणि नंतर लाईनवर येतात. पण आता मात्र त्यांनी लाईनवर येणे अमान्य केले आणि सरळसरळ आपला पक्ष आघाडीतून बाहेर पडेल, असे जाहीर केले. येत्या शुक्रवारी त्यांच्या पक्षाचे केंद्रातले मंत्री राजीनामे देतील, असेही त्यांनी घोषित केले.

ममता बॅनर्जी यांच्या या पवित्र्यामुळे केंद्रातले सरकार पडणार की काय, यावर आता चर्चा सुरू झालेली आहे. परंतु आम्हास अजून तरी तशी शक्यता वाटत नाही. कारण ममता दिदींना हे सरकार खरोखर पाडायचेच असते तर त्यांनी कालच आपल्या मंत्र्यांचे राजीनामे राष्ट्रपतींकडे पाठवून दिले असते. परंतु त्यांनी या राजीनाम्यासाठी आणखी ७२ तासांचा अवधी मागून घेतला आहे. शिवाय त्या सरकारवर कितीही रागावल्या असल्या आणि आपण अपमानीत झालो आहोत असे त्यांना वाटत असले तरीही त्यांनी काही अटींवर आपला पक्ष आपल्या निर्णयाचा फेरविचार करील असेही म्हणून ठेवले आहे. भाजपाचे नेते ममता बॅनर्जी यांच्या निर्णयाने अगदी खूष झालेले आहेत. परंतु काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र धीर सोडलेला नाही. ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस हा पक्ष अजूनही संपु आघाडीचा घटक आहे. एवढेच नव्हे तर आघाडीचा महत्वाचा घटक आहे, असे त्यांनी म्हटले आहे. सरकार पडायला अजून ७२ तास आहेत. दरम्यानच्या काळात पुन्हा एकदा चर्चा होऊ शकते आणि ममता बॅनर्जी आपल्या निर्णयाचा फेरविचार करू शकतात, अशी आशा अजूनही काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे आणि त्यांच्या त्या वाटण्यात बरेच तथ्यही आहे.

ममता बॅनर्जी यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी ज्या अटी घातल्या आहेत त्या इतक्या सोप्या आणि काँग्रेसने मान्य कराव्यात अशाच आहेत. त्यामुळे पंतप्रधान त्यांच्या काही मागण्या मान्य करतील आणि शेवटी आपल्या रागाच्या पवित्र्याला यश आले आहे असे चित्र निर्माण करणे ममता बॅनर्जी यांनाही शक्य होईल आणि ममता बॅनर्जी पुन्हा लाईनवर येतील.

सरकारने डिझेलचे दर लिटरमागे पाच रुपयांनी वाढवले आहेत. त्यातल्या एखाद्या रुपयांची वाढ कमी करावी, अशी ममता बॅनर्जी यांची मागणी आहे. सरकारला ही मागणी मान्य करणे फारसे अवघड नाही. शिवाय स्वयंपाकाच्या गॅसच्या नऊ टाक्या नियंत्रित दरात देण्याचे सरकारने जाहीर केले आहे. त्या नऊ ऐवजी १२ टाक्या द्याव्यात असे ममता दिदींचे मागणे आहे. दोघांच्या मध्ये १० टाक्यांवर तडजोड होऊ शकते. सरकारलाही आपले म्हणणे खरे केल्याचे समाधान मिळते आणि ममता दिदी यांचीही गरिबांच्या कैवारी ही प्रतिमा टिकून रहायला मदत होते. एकंदरीत गॅसच्या टाक्यांच्या बाबतीत तडजोड शक्य आहे. तिसरा प्रश्न आहे किरकोळ विक्री क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीचा. याबाबतीत एक तडजोड करण्याची तरतूद सरकारने आधीच केलेली आहे.  या १०० टक्के थेट परकीय गुंतवणुकीची कोणत्याही राज्यावर सक्ती असणार नाही. राज्यांना याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार असेल.

अशा तडजोडी आधीच तयार आहेत. हे निर्णय होणार आहेत हे ममता दिदींना माहीत होतेच. परंतु हा सारा खेळ आणि नाटक सुरू आहे. कारण ममता दिदींना आपली प्रतिमा टिकवायची आहे. त्यांना आपल्या राज्यामध्ये डाव्या आघाडीशी सामना करावा लागतो. डावे पक्ष हे गरिबांचे कैवारी म्हणवले जातात आणि सर्वसामान्य माणसांच्या मागण्यांसाठी त्यांचा आंदोलनाचा कार्यक्रम नेहमी तयारच असतो. अशा डाव्या आघाडींशी पश्चिम बंगालमध्ये स्पर्धा करायची असेल तर सामान्य माणसांचे आपणच कैवारी आहोत हे दाखवणे ममता बॅनर्जी यांच्यासाठी आवश्यक आहे. म्हणूनच त्या दरवाढीच्या मुद्यावर खवळल्याचे नाट करीत असतात. आताही त्यांचे नाटक जारी आहे. भाववाढीच्या मुद्यावर त्यांनी सरकारला झुकवल्याचे चित्र निर्माण झाले की त्या आपली तलवार म्यान करतील, असे शुक्रवारी घडण्याची शक्यता आहे. त्यांच्या या अट्टाहासामुळे सरकार पडणार नाही याची त्यांनाही जाणीव आहे. म्हणूनच त्या सरकार पाडण्याच्या भानगडीत पडणारच नाहीत. त्यांना फक्त आपली प्रतिमा टिकवून ठेवायची आहे.