काँग्रेस नवे मासे गळाला लावण्याच्या तयारीत

नवी दिल्ली: तृणमूल काँग्रेसने संयुक्त पुरोगामी आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केल्यावर केवळ समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षावर विसंबून न राहता नवे मासे गळाला लावण्याचा प्रयत्न काँग्रेसने सुरू केला आहे.

रिटेल क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीला मान्यता, डिझेल दरवाढ आणि सिलेंडरचे रेशनिंग यामुळे संतप्त झालेल्या ममता दिदींनी सरकार आणि संपुआतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केल्यावर सरकारची खुंटी बळकट करण्यासाठी नव्या मित्र पक्षांची चाचपणी सुरू असून काही पक्षांबरोबर चर्चा सुरू असल्याचे अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितले.

बिजू जनता दलाचे अध्यक्ष नवीन पटनाईक आणि केंद्रीय मंत्री कमलनाथ यांच्यातील जवळीक लक्षात घेऊन बिजू जनता दलाला ‘पटविण्या’ची कामगिरी कमलनाथ यांच्यावर सोपविण्यात आली होती. कमलनाथ यांच्या शिष्टाईला फळ आले असून बिजू जनता दल सरकारला बाहेरून पाठींबा देण्यास तयार खाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

तृणमूल अध्यक्षा ममता बेनार्जी यांची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येत असले तरीही काँग्रेसने पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसची मदार असलेले सप आणि बसप यांनी सध्या शांत राहायचे धोरण अवलंबिले आहे; तर नितीशकुमार यांनी बिहारला विशेष दर्जा देईल त्याची पाठराखण करण्याचे गाजर सत्ताधारी आणि विरोधक या दोघांना दाखविले आहे.

Leave a Comment