राजकीय पक्ष नको – अण्णांच्या निर्णयाचे विचारवंतांकडून स्वागत

पुणे दि .१९- भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे प्रणेते अण्णा हजारे यांनी राजकीय पक्ष स्थापनेपासून दूर राहण्याचा तसेच निवडणूक न लढविण्याच्या निर्णयाचे पुण्यातील विविध क्षेत्रातील विचारवंतांकडून स्वागत करण्यात आले आहे. हजारे यांनी पुण्यातील पर्यावरणतज्ञ माधव गाडगीळ, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, सामाजिक कार्यकर्त्या सुधा सरदार, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ.नरेंद्र दाभोळकर, सर्वोदय संघाचे अध्यक्ष जयवंत मठकर आणि अण्णांचे सहकारी व प्रदूषण तज्ञ विश्वंभर चौधरी यांना आमंत्रित करून भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाची पुढची दिशा काय असावी याविषयी चर्चा केली होती. विशेष म्हणजे कांही काळापूर्वी अण्णांचे निकट समजले जाणारे मोहन धारिया, रिक्षा संघटनेचे बाबा आढाव आणि युवा क्रांती दलाचे कुमार सप्तर्षी यांना मात्र बैठकीला बोलविले गेले नव्हते.

पर्यावरणतज्ञ माधव गाडगीळ यांनीही राजकारणात उतरू नये असे मत व्यक्त केले तर सरदार यांनी हीच चळवळ अधिक मजबूत करावी तसेच चळवळीचा दीर्घकालीन कार्यक्रम निश्चित करावा असे मत दिले. त्या म्हणाल्या की निवडणुकात उतरणे म्हणजे भ्रष्टाचाराला आमंत्रण आहे कारण पैशाशिवाय निवडणुका जिंकता येत नाहीत. नरेंद्र दाभोळकर यांनीही हीच चळवळ अधिक तीव्र करावी आणि अण्णा ती करू शकतात कारण त्यांना मास अपील आहे असे मत दिले. लोकांचा चळवळीतील सहभाग वाढावा यासाठी लोकांशी सतत चर्चा आणि कांही ना कांही कार्यक्रम सतत सुरू ठेवले पाहिजेत असे सर्वांचेच मत पडले तर अविनाश धर्माधिकारी यांनी केजरीवाल यांच्यासोबत जाणार नसल्याचे व निवडणूकही लढविणार नसल्याचे सांगितले. विश्वंभर चौधरी यांनी प्रत्येक चळवळीची नाळ राजकारणाशी जोडलेलीच असते असे सांगून प्रश्न फक्त निवडणूका लढवायच्या का आणि त्यासाठी राजकीय पक्ष स्थापन करायचा का इतकाच असल्याचे सांगितले.

दरम्यान अण्णा आज दिल्लीत अरविंद केजरीवाल, किरण बेदी आणि सिसोदिया यांची भेट घेणार आहेत. दिल्लीला जाण्यापूर्वी पुण्यात बोलताना अण्णांनी केजरीवाल आणि त्यांच्यात मतभिन्नता असल्याचे मान्य केले. अण्णा म्हणाले कुणी मला शहाणा म्हणतो तर कुणी मूर्ख म्हणतो. मात्र कोणतेही विधान करताना लोकांचा गोंधळ उडावा असा माझा कधीच प्रयत्न नसतो. पूर्वीपासूनच मी राजकीय पक्ष काढणार नाही आणि निवडणूक लढविणार नाही असेच सांगत आलो आहे. मात्र केजरीवालांना माझा विरोध नाही. ते पक्ष काढू शकतात. स्वच्छ चारित्र्याच्या कोणत्याही पक्षाच्या उमेवाराचा प्रचार करण्यास माझी तयारी आहे. केजरीवाल यांचा मार्ग भिन्न असला तरी आमचा अंतिम उद्देश एकच आहे असेही अण्णा म्हणाले.

Leave a Comment