काँग्रेसकडून ममतांची मनधरणी

नवी दिल्ली: संयुक्त पुरोगामी आघाडीतून बाहेर पडलेल्या तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून जारी आहे. मात्र तृणमूलच्या मागण्या मान्य करण्याबाबत काँग्रेस मूग गिळून असल्याने ममतांचा पारा सध्या तरी खाली यायला तयार नाही. खुद्द पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी संपर्क साधूनही ममता दिदींनी त्यांना दाद दिली नाही.

संपुआ सरकारने अचानक रिटेल क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीला मान्यता, सिलेंडरचे रेशनिंग आणि डीझेल दरवाढीचे निर्णय जाहीर केले. त्यामुळे तृणमूल कॉंग्रेसने संपुआअधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला.

त्यापूर्वी झालेल्या चर्चेच्या फेरीत तृणमूलने डीझेल दरवाढ ५ रुपये प्रतिलिटरवरून ३ ते ४ रुपये प्रतिलिटरपर्यंत घटवावी; सवलतीत मिळणार्‍या सिलेंडरची संख्या ६ वरून १२ करावी आणि रिटेल क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीची मान्यता काढून घ्यावी; अशा मागण्या केल्या होत्या.
मात्र काँग्रेस ममतांची मनधरणी करण्याच्या प्रयत्नात असली तरीही आपल्या निर्णयापासून मागे फिरण्याची तयारी काँग्रेस सध्या तरी दाखवित नाही. आम्ही हे निर्णय कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या अगतिकतेतून घेतले हे आम्ही तृणमूलला समजावून देऊ; असेच काँग्रेसचे म्हणणे आहे. त्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बुधवारी आपल्या निवासस्थानी वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांची बैठक बोलाविली. या दरम्यान दोन वेळा ममता दिदींशी दूरध्वनी वरून संपर्क साधण्याचा प्रयत्नही केला. मात्र दिदींनी त्यांना प्रतिसाद दिला नाही.

दरम्यान आपली खुंटी बळकट करण्यासाठी कॉंग्रेसने समाजवादी पक्षाशीही संपर्क साधला. मात्र समाजवादी पक्षाने कोणतेही ठोस उत्तर न देता आपण घाईने कोणताही निर्णय घेणार नाही; असे संदिग्ध उत्तर दिले आहे. बहुजन समाजवादी पक्ष आणि द्रविड मुन्नेत्र कळघमही केंद्र सरकारच्या आर्थिक सुधारणांच्या निर्णयावर नाराज आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार ‘यशस्वी माघारी’चे धोरण अंगीकारून आणि तृणमूल, सपसारख्यांना कोणत्या तरी मोबदल्याचे गाजर दाखवून पेचप्रसंग निभावून नेईल; मात्र संपुआ फुटू देणार नाही; अशी लक्षणे आहेत.