राज यांचा एफडीआयला पूर्ण पाठींबा

मुंबई: रिटेल क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला माझा पूर्ण पाठींबा आहे. मात्र राज्यात येणार्‍या विदेशी कंपन्यांनी नोकर्‍यांमध्ये स्थानिक मराठी तरुणांना प्राधान्य दिले पाहिजे; असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

रिटेलमध्ये विदेशी कंपन्यांनी पदार्पण केल्यास शेतकरी आणि ग्राहक दोघांचाही फायदा होणार आहे. मात्र त्यातील नोकरीचा फायदा स्थानिकांनाच मिळायला हवा. बिहार आणि उत्तर प्रदेश विदेशी कंपन्याना त्यांच्या राज्यात येऊ देणार नाहीत आणि तिकडून आलेले लोंढे इथल्या मॉलमध्ये नोकर्‍या करणार; हे कधीही खपवून घेणार नाही; असा इशाराही राज यांनी दिला.

डीझेल दरवाढ आणि सिलेंडरचे रेशनिंग याला मात्र मनसेचा कडाडून विरोध असल्याचे सांगत महाराष्ट्र सरकारने डीझेल आणि सिलेंडरवरील कर कमी करावे; अशी मागणी त्यांनी केली.

महाराष्ट्रासह देशात गणेशोत्सव सुरू असताना बंद कसला करता; असा सवाल करत त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वालाही धारेवर धरले.

Leave a Comment