मुंबई: डिझेलची दरवाढ मागे घ्यावी आणि कस्टम, एक्साईज ड्युटीतही कपात करावी या मागणीसाठी गुरुवारी देशभरातील ७५ लाख वाहतूकदारांनी बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन गणेशोत्सवात बंद करण्याच्या निर्णयाचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर होऊन सुमारे २५० कोटी रुपयांचे नुकसान होण्याचे शक्यता आहे.
ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस या वाहतूकदारांच्या शिखर संघटनेने हा बंद पुकारला आहे. या आंदोलनामुळे देशातील ७५ लाख तर राज्यातील २५ लाख वाहने बंद राहणार आहेत. भाजीपाला, धान्य, दूध, औषधे यासह सर्व मालवाहतूक करणारी वाहने गुरुवारी बंद राहतील.
अवाजवी टोल, टायर, सुटे भाग, विमा यांचा वाढता खर्च, आस्थापना खर्च यामुळे आधीच डबघाईला आलेल्या वाहतूकदारांना डीझेल दरवाढीचा बोजा पेलविणार नसल्याने ही दरवाढ त्वरित मागे घ्यावी; अशी मागणी करतानाच आपल्या एका दिवसीय बंदची दाखल २० दिवसात न घेतल्यास वाहतूकदार बेमुदत बंद करतील; असा इशाराही संघटनेने दिला आहे.