चौकशीच्या परवानगीचे भुजबळांकडून स्वागत

अमरावती: कथित महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करण्यास राज्याच्या गृह विभागाने दिलेल्या परवानगीचे आपण स्वागत करतो; अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. चौकशी झाल्यावर सत्य जगासमोर येईल आणि माझ्यावरील आरोप बिनबुडाचे असल्याचेही स्पष्ट होईल; असेही भुजबळ म्हणाले.

गृह विभागाकडे मागणी करूनही चौकशीची परवानगी मिळत नसल्याची बाब भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडून आलेल्या पत्रातून उघड झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैय्या यांनी नुकताच केला होता. मात्र गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सोमवारी त्यांच्या आरोपाची दखल घेऊन चौकशीची परवानगी दिल्याचे जाहीर केले.

सोमैया यांनी भुजबळ यांच्यावर महाराष्ट्र सदन प्रकरणी आरोप करून भ्रष्टाचार विरोधी विभागाकडे तक्रार केली होती. महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाचे कंत्राटदार चमणकर यांना कोट्यावधीचा एफएसआय बहाल करून हा गैरव्यवहार झाल्याचा सोमैय्या यांचा आरोप असून हा घोटाळा १० हजार कोटीच्या पुढचा असल्याचा त्यांचा दावा आहे.

Leave a Comment