मुंबई दि.१८- गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली असतानाच मुंबर्थतील प्रसिद्ध गणेश गल्लीतील लालबागच्या राजाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १११८ पंचमुखी रूद्राक्ष माला अर्पण केली असून उद्या गणेशस्थापनेच्या वेळी ही माळ राजाला घालण्यात येणार आहे. यंदा हे मंडळ नेपाळच्या प्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिराची प्रतिकृती करणार आहे. विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांना ही माळ नेपाळमधूनच मिळाली आहे. पशुपतीनाथ मंदिरात त्यांनी पूजा केल्यानंतर शिवसेनेबद्दल प्रेम असणार्या एका नेपाळमधील व्यक्तीनेच ही माळ त्यांना दिली होती.
या विषयी अधिक माहिती देताना शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोर्हे म्हणाल्या की या माळेशी बाळासाहेबांचे वेगळेच भावनिक नाते आहे. गणेश गल्ली लालबाग राजाला माळ देताना प्रत्यक्ष बाप्पालाच ती पोहोचली असल्याची त्यांनी भावना आहे. शिवाय यंदा पशुपतीनाथाचे मंदिर येथे साकारले जात आहे आणि ही माळही प्रत्यक्ष पशुपतिनाथ मंदिरातूनच मिळालेली आहे.
मंडळाचे सचिव स्वप्नील परब म्हणाले की आमच्या मंडळाला ही माळ मिळाल्याचा खरच आनंद आहे. त्यातूनही ती बाळासाहेबांकडून मिळाल्याने विशेष आनंद आहे. ही माळ ते शहरातल्या कोणत्याही मंडळाला देऊ शकले असते पण त्यांनी आमची निवड केली. उद्या स्थापनेच्यावेळी ही माळही गणपतीला घातली जाईल. आमच्या साठी ही अभिमानाची गोष्ट आहे. कालच ती मातोश्रीवरून आमच्याकडे पाठविण्यात आली व लगेच मूर्तीवर चढविली गेली.
लालबागच्या मंडळाने यंदा ११ दिवसांच्या या उत्सवात सर्व भाविकांसाठी १५ कोटी रूपयांचा विमा उतरविला आहे. राजाच्या दर्शनासाठी आत्तापासूनच रांगा लागल्या आहेत प्रत्यक्ष दर्शन उद्या सकाळी सहा नंतर सुरू होणार आहे.