स्थलांतराचे वास्तव

मुंबई ही मायानगरी आहे. जो कोणी पोटासाठी म्हणून मुंबईकडे धाव घेतो त्याच्या पोटाची सोय मुंबईत होते. त्यामुळे गावाकडे उपासमार होणारे मजूर दुष्काळाचा तडाखा बसायला लागला की, मुंबईत स्थलांतर करतात. केवळ मुंबईच नाही तर पुणे, हैदराबाद, अहमदाबाद, सूरत अशा किती तरी शहरांमध्ये त्या त्या राज्यातून आणि राज्याबाहेरून मोठे स्थलांतर झालेले आहे. १९६० आणि ७० च्या दशकामध्ये मुंबईत दक्षिण भारतातून मोठे स्थलांतर झाले आणि त्यातूनच शिवसेना वाढीस लागली. नंतरच्या दशकात उत्तर प्रदेश आणि बिहारमधून बरेच लोक मुंबईत पोट भरण्यासाठी आले आणि २००५ सालपासून या मुद्यांवरून राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना निर्माण होऊन वाढीचा प्रयत्न करत आहे. परंतु आजच्या जगामध्ये स्थलांतर हे एक असे वास्तव आहे की, जे नाकारता येत नाही आणि ज्याच्या विरोधात कसलीही मोहीम काढून राजकारण करणे अव्यवहार्य ठरते.

१९६० आणि ७० च्या दशकात परराज्यातले लोंढे मुंबईत येत होते तेव्हा मराठी माणूस महाराष्ट्राच्या बाहेर जात नव्हता. परंतु आता सगळ्या राज्यांतून सगळ्या राज्यांमध्ये मोठे स्थलांतर सुरू झालेले आहे. भारतात ३४ टक्के लोक कोठून ना कोठून तरी स्थलांतरित होऊन आलेले आहेत. बंगळूर हे अतिशय वेगाने वाढणारे शहर आहे. या शहरामध्ये माहिती तंत्रज्ञान, तयार कपडे आणि जैव तंत्रज्ञान हे तीन उद्योग विलक्षण गतीने वाढत आहेत. या उद्योगांची मनुष्यबळाची गरज मोठी आहे आणि जिथून लोक येऊन या उद्योगाला लागतील तिथून ते आलेले आहेत आणि बंगळूरमध्ये स्थायिक झाले आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर गेलेला मराठी माणूस गुजरात आणि बंगळूरमध्ये मोठ्या संख्येने स्थायिक झालेला आहे.

शिवसेनेच्या वाढीच्या काळामध्ये मुंबईत बाहेरचे लोंढे येत होते तसा मराठी माणूस बाहेर जात नव्हता. त्यामुळे मुंबईत येणार्‍या लोंढ्यांच्या विरोधात वातावरण तयार करता आले आणि त्याला बाळासाहेब ठाकरे यांना काही प्रमाणात यशही आले. आता मात्र स्थलांतराची वस्तुस्थिती बदललेली आहे. राष्ट्रीय सर्वेक्षण घटक संघटना या संघटनेने भारतातल्या स्थलांतराचा अभ्यास केला आहे. त्यानुसार मुंबईत बाहेरून येणार्‍या लोकांपैकी ७० टक्के लोक महाराष्ट्रातलेच असल्याचे निष्पन्न झाले आहे. मुंबईत आलेल्या दर हजार लोकांमागे ३७० लोक महाराष्ट्राच्या खेड्यातून आलेले तर ४०० लोक हे महाराष्ट्राच्या विविध छोट्या-मोठ्या शहरातून आलेले आहेत. परराज्यातून आलेल्या लोकांचे प्रमाण १९० एवढे आहे.

या प्रमाणाचा विचार केला असता परराज्यातून आलेले लोक हे मुंबईवरचे मोठे संकट आहे असे काही म्हणता येत नाही. परंतु राज ठाकरे मात्र उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्या लोकांनी मुंबई व्यापून चाललेली आहे असे वातावरण तयार करतात ते चुकीचे आहे. मुंबईत बाहेरच्या राज्यातून आलेल्या लोकांचाही एक वेगळा अभ्यास गतवर्षी करण्यात आला होता. त्यातही विविध राज्यातून आलेल्यांचे प्रमाण मोजण्यात आले होते. बाहेरच्या राज्यातून आलेल्या लोकांत कर्नाटकातून आलेल्या लोकांची संख्या सर्वात जास्त असल्याचे त्या पाहणीत आढळले होते. परराज्यातील स्थलांतरित लोकांत गुजराती लोक मोठे असावेत असे सकृतदर्शनी दिसते. परंतु गुजराती लोकांपेक्षाही कर्नाटका तून आलेल्या लोकांची संख्या जास्त आहे. परराज्यातून आलेल्या लोकांत कर्नाटकातून आलेल्या लोकांचे प्रमाण १३ टक्के तर बिहारमधून आलेल्या लोकांचे प्रमाण ७ टक्के एवढे आहे असे या पाहणीत दिसून आले होते.

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये विकासाची कामे कमी झालेली आहेत. त्यामुळे रोजगार निर्मिती होत नाही आणि म्हणून या लोकांना मुंबईत यावे लागते, असे एकंदरीत चित्र आहे. परंतु तेही आता बदलत चालले आहे. महाराष्ट्रात कामे करण्यासाठी बिहार आणि उत्तर प्रदेशातल्या लोकांना आणणारे काही एजंट आहेत आणि अशा एजंटांनाही आता बिहारमधले मजूर महाराष्ट्रात येण्यास तयार नसल्याचे जाणवायला लागले आहे. कारण त्यांना बिहारमध्येच चांगला रोजगार मिळत आहे. एक तर बिहारचा विकासच वेगाने सुरू झालेला आहे. तेही एक कारण आहेच. पण केंद्र सरकारची महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना हे सुद्धा एक कारण आहे. या लोकांना आपल्या गावी वर्षातून १०० दिवस दररोज १५० रुपये मजुरी देणारा रोजगार मिळत आहे. आता तर १०० दिवसात वाढ होणार आहे आणि ते १५० दिवस होणार आहेत. मजुरीत सुद्धा १५० रुपयांवरून तब्बल २५० रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. असे झाल्यास बिहारच्या लोकांना मुंबईत येऊन झोपड्यात राहण्याची गरजच नाही.

बिहारचे मजूर केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर सगळ्या राज्यांमधून कमी झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या नावावरून राजकारण करणार्‍यांना तशी संधीच राहणार नाही. म्हणूनच बाळासाहेब ठाकरे यांनी आता पंजाब आणि गुजरातमधले हिंदू आम्हाला चालतील, असे म्हटले आहे. खरे म्हणजे हिंदू तो हिंदूच. तो बिहारमधला असला तरी हिंदूच असतो. परंतु बाळासाहेबांच्या सगळ्याच व्याख्या निराळ्या असतात. मात्र प्रादेशिक भावनांना खतपाणी घालून तसेच परराज्यातल्या लोकांचा द्वेष वाढवून राजकारण करणे आता फार दिवस चालणार नाही हे त्यांच्या लक्षात आलेले आहे.

Leave a Comment