विविध कंपन्यांचे टॅब्लेटस बाजारात युवा पिढीला आकर्षून घेत असतानाच आता चिमुकल्यांसाठीही अमेरिकेतील आर कंपनीने टॅब्यू बाजारात आणण्याची घोषणा केली असून ही कंपनी लहान मुलांसाठी खेळणी बनविणारी कंपनी आहे. १५० डॉलर्समध्ये उपलब्ध होऊ शकणारा हा टॅब्यू लहान मुलांची खेळण्याची गरज जशी पुरी करेल तसेच त्यांच्या ज्ञानातही भर घालणार आहे. सोमवारीच कंपनीने ही घोषणा केली असून २१ आक्टोबरला हा टॅब्यू कंपनी शोरूममध्ये दाखल होईल.
लहान मुलांसाठी मनोरंजन, विज्ञान, गणित, भाषाशिक्षण हा टॅब्यू पुरविणार आहे. सात इंचाच्या या टॅब्यूत मल्टीटचबरोबरच विविध ५० अॅप लोड करूनच दिले जाणार आहेत. त्याचबरोबर पालकांची गरज लक्षात घेऊन सुरक्षेशी निगडीत सर्व फिचर्सही यात अपलोड केली जाणार आहेत. लहान मुलांबरोबरच पालकही हा टॅब्यू वापरू शकणार आहेत. इंटरनेटसाठी एक्स्लोरर सुविधा देण्यात आली असून लहान मुलांना सध्या वेड लावलेल्या अँग्री बर्डस बरोबरच निजा, टेंपल रन असे २० गेम्सही लोड करून दिले जाणार आहेत. टिकी गोल्फ, टिकी कार्ट थ्रीडी सारखे प्रसिद्ध गेम्सही यात समाविष्ट आहेत.
विज्ञान, गणित व अन्य विषयांसाठी मुलांना सहज समजू शकतील अशी विविध १० अॅप्सही यात मिळणार असून त्यामुळे मुलांना हसतखेळत अभ्यास करता येणार आहे असा कंपनीचा दावा आहे. त्याचबरोबर मनोरंजनासाठी छायाचित्रण, पाककला हेही भाग आहेत तसेच मुलांमध्ये वाचनाची आवड वाढावी यासाठी विविध प्रकारचे बाल वाङमयही यात लोड करण्यात आले आहे.