पुणे दि.१८ – चोवीस वर्षांपूर्वी गणेशोत्सवाचे निमित्त साधून गणेशोत्सवाचा सोहळा अधिक सांस्कृतिक करण्यासाठी पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी यांनी सुरू केलेला पुणे फेस्टीवल गतवर्षी कसाबसा साजरा झाला. राष्ट*कुल घोटाळ्यात अडकल्याने नऊ महिने तिहार वारी करून आलेल्या कलमाडी यांना काँग्रेसने निलंबित केले आणि पुण्यातील त्यांचा दरारा आणि रूबाबही ओसरला. मात्र हार मानणार्यांपैकी कलमाडी नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध करण्यासाठी ते सरसावले असून सार्वजनिक जीवनात आलेले एकाकीपण संपविण्यासाठी त्यांनी पुन्हा पुणे फेस्टीवलचाच आधार घेतला असल्याचे दिसून येत आहे.
कलमाडींच्या नेतृत्त्वाखाली यंदा पुणे फेस्टीवल जोरात
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सिनेस्टार, म्युझिक नाईटस, विविध खेळांच्या स्पर्धा, विविध राजकीय नेत्यांची हजेरी, कलावंताचा सहभाग यांनी पुणे फेस्टीवलला ग्लॅमरस लूक प्राप्त झाला होता. या वर्षी पुन्हा एकदा अशाच जंगी कार्यक्रमांची जंत्री सादर करण्यात आली असून कलमाडी यांनी आपण राजकारणातून गेलेलो नाही हे सिद्ध करण्याचा जणू चंगच बांधला आहे. यंदाच्या फेस्टीवलचे उद्घाटन भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते, प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री राष्ट्रवादीचे छगन भुजबळ तसेच काँग्रेसमधील हर्षवर्धन पाटील, डॉ.पतंगराव कदम, बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत या चार बड्या नेत्यांना कलमाडींनी आमंत्रित केले असून या सर्वांनी आमंत्रणाचा स्वीकार केला आहे.
दरवर्षीप्रमाणेच यंदा सिनेअभिनेत्री आणि राज्यसभेचे खासदारपद भूषविलेल्या हेमामालिनी नवा महालक्ष्मी बॅले सादर करणार आहेत तर सूफी संगीत, अशोक मस्ती म्युझिक नाईट, स्केटिग, बॉक्सिंग स्पर्धा, व्हिंटेज कार रॅली, हास्यकवी संमेलन असे भरगच्च कार्यक्रम यंदा होणार आहेत.
विशेष म्हणजे कलमाडी यांनी निमंत्रित केलेल्या अतिथींच्या यादीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेस सुरवात झाली आहे. पुण्याचे शहराध्यक्षपद गडकरी गटाकडे गेल्याने नाराज असलेले मुंडे, अजित पवार यांच्याशी सतत स्पर्धा असलेले हर्षवर्धन पाटील, अजित पवारांशी फारसे सख्य नसलेले छगन भुजबळ आणि एकूणच राज्यातील प्रस्थापित नेत्यांविषयी नाराजी असलेले पतंगराव कदम यांनी उपस्थित राहण्यास संमती दिल्याने ही चर्चा विशेष रंगते आहे.
कलमाडींच्या या उत्सवाला प्रायोजकांचीही कमतरता नाही. यंदा या उत्सवाचे प्रायोजक महाराष्ट्र बँक आहेत. तर पुनावाला, बजाज या उद्योजकांनी सहकार्याचा हात पुढे केला आहे. कोकाकोला बरोबरच भारती विद्यापीठ आणि डी.वाय.पाटील या शैक्षणिक संस्थांनीही हातभार लावला आहे. कलमाडी यांनी फेस्टीवलचे निमित्त साधून आपली किमया दाखवून दिली असल्याचेही बोलले जात आहे.