शोध पाण्याचा

पाण्याचा शोध घेणारी एक परिषद आज लातूर येथे होत आहे. पाण्याचा शोध घेण्याची वेळ आज सगळ्या जगावरच आली आहे पण त्यातल्या त्यात मराठवाडा हा भाग पाण्याच्या बाबतीत फारच दुर्दैवी आहे  म्हणून ही परिषद आज लातूर येथे होत आहे याला काही एक औचित्य आहे.  या परिषदेचे नामाभिधानही यथोचित ‘सामना दुष्काळाशी’ असे करण्यात आले आहे. भारतातल्या हरित क्रांतीचे जनक  डॉ. स्वामीनाथन, शेतकरी संघटनेचे अभ्यासू नेते विजय जावंधिया आणि मॅगॅसेसे पुरस्कार विजेते राजस्थानातले जोहडकार राजेन्द्रसिंह यांचे मार्गदर्शन हे या परिषदेचे आकर्षण राहणार आहे. कारण पाणी हा आजच्या संकट काळातला परवलीचा शब्द झाला आहे. सारे काही निर्माण करता येते पण पाणी निर्माण करता येत नाही. निसर्गात आहे तेवढे पाणी कायम आहे. त्यात काही वाढ होत नाही. ते निरनिराळ्या प्रकारांनी जमिनीत जिरते आणि  तिथून पुन्हा कधी तरी वर येऊन वाफेच्या रूपाने आकाशात जाऊन पावसाच्या रूपाने खाली पडते. आज काल आपण सर्वजणच पाऊसमान कमी झाले म्हणून खंत व्यक्त करीत असतो पण तिच्यात काही तथ्य नाही.        

पाऊस आहे तेवढाच आहे. पाणीही आहे तेवढेच आहे. त्यांचा वापर वाढला आहे. पाण्याच्या वाढत्या गरजांनी आपल्याला पाण्याचा शोध घ्यावा लागत आहे. केवळ भारतातच नाही तर सार्‍या जगातच आज पाण्याचा वापर वाढला आहे. तेव्हा पाण्याचा शोध घ्यावासा वाटतच असेल तर त्यासाठी पाण्याचा विवेकपूर्ण वापर कसा करता येईल यावर आपल्याला विचार करावा लागणार आहे. अशा वापरावर काही विचार करायचा झाला तर एक प्रकारचा वैचारिक तिढा निर्माण होतो. आपण पाण्याचा वापर वाढवला आहे तो विकासासाठी वाढवला आहे. पूर्वी सगळ्याच शेतकर्‍यांच्या शेतीला पाणी मिळत नसे. आता धरणे बांधून आपण जास्तीत जास्त शेतकर्‍यांना पाणी दिले आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई जाणवत आहे पण त्या पायी आपण अधिकात अधिक शेती बागायत करून प्रगतीच केली आहे. हीच गोष्ट उद्योगाची झाली आहे. उद्योगाला पाणी लागते. ते वापरायला सुरूवात झाली की पाण्याची टंचाई जाणवायला लागते पण ही टंचाई उद्योगांच्या वाढीचा परिणाम असतो. मग आपण पाण्याची मुबलकता व्हावी म्हणून उद्योगांवर बंधने घालणार आहोत की त्यांना पाणी देणे बंद करणार आहोत ? उद्योग वाढले की शहरी करण होणे अपरिहार्य ठरते.

शहरांना खेड्यांपेक्षा अधिक पाणी पुरवावे लागते. मग आपण पाण्याचा शोध घेताना शहरीकरणाला आळा घालणार आहोत की शहरातल्या लोकांना आडा-विहिरींचे पाणी वापरण्याचा सल्ला देणार आहोत ? सांगायचा हेतू असा की पाण्याची टंचाई ही आपल्या प्रगतीतून निर्माण झाली आहे. आपण प्रगतीची साखळी प्रक्रिया सुरू करून दिली आहे. ती आता थांबवता येत नाही. त्यातून अनेक गहन प्रश्न निर्माण होत असतात. ते प्रश्न या प्रक्रियेच्या फायद्यापेक्षा तोटे अधिक दाखवणारी असली तरीही ती प्रक्रिया आता थांबवता येत नाही. तिच्यात निर्माण झालेल्या समस्या सोडवूनच पुढे जावे लागते. पाण्याची समस्या अशीच आहे. या प्रक्रियेने आता शेतकर्‍यांचा पाण्यावरचा हक्कच नाकारला आहे. धरणे बांधताना ती शेतकर्‍यांसाठी असल्याचे सांगितले जाते. अनेक शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीवरून  विस्थापित करून ती बांधली जातात पण त्या पाण्यावर पहिला हक्क शहरातल्या लोकांचा असतो. तसा आता कायदाच झाला आहे. कारण पिण्याचे पाणी ही सर्वात प्राथमिक गरज असते. पहिला हक्क त्यांचा, दुसरा हक्क उद्योगांचा आणि या दोन घटकांच्या वापरातून पाणी वाचले तर त्यावर तिसरा हक्क शेतकर्‍यांचा असा आता प्राधान्यक्रम झाला आहे. या पाण्याच्या वाटपाने केवळ शेतीचेच नुकसान होते असे नाही. तर सामाजिक आणि राजकीय स्थिती बदलून जाते कारण लोकशाहीतली सत्ता कॅनॉलच्या पाण्यातून वाहात असते. कॅनलचे पाणी शहरांत वाहायला लागले तर शेतकरी वर्ग सत्तेच्या परिघाच्या बाहेर जाणार आहे.

पाण्याचा शोध घेताना हेही वास्तव आपल्याला ध्यानात घ्यावे लागणार आहे. यातून मोठा संघर्ष निर्माण होणार आहे  असे सकृत्दर्शनी जाणवते पण ते काही अंतिम सत्य नाही.  पाण्याची ओढाताण ही एक आपत्ती आहे आणि तिच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले तर संघर्षाच्या ऐवजी काही तरी उपाय सापडण्याची शक्यता आहे. पाण्यासाठी संघर्ष न करता आपल्याला आहे ते पाणी नीट वापरण्याचा विचार करावा लागणार आहे. तसा तो करायला लागलो तर असे लक्षात येते की आपल्या देशात उपलब्ध  असलेले पाणी कमी नाही. पाण्यासाठी संघर्ष करणार्‍या तिन्ही घटकांना हेच पाणी काटकसरीने कसे वापरता येईल यावर विचार करावा लागणार आहे. तसा विचार केल्यास उपाय सापडू शकतो कारण पाणी कमी नाही.  पाण्यासाठीचा संघर्ष टाळून विधायक उपाय शोधायचा असेल  काटकसर हाच एक मोठाच प्रभावी मार्ग राहणार आहे. लातूरच्या परिषदेत यावर काही विचार व्हावा अशी अपेक्षा आहे.

Leave a Comment