वादग्रस्त एसीपी वसंत ढोबळे यांची अखेर बदली

मुंबई, दि.१६ – मुंबईच्या रात्रभर चालणार्‍या पब संस्कृतीच्या मुळावर उठलेले एसीपी वसंत ढोबळे यांची अखेर सामाजिक सेवा विभागातून बदली करण्यात आली आहे. ढोबळे हे आता वाकोला परिसराचे एसीपी म्हणून काम पाहणार आहेत.

रात्री उशिरा चालणार्‍या पब, बार, हुक्का पार्लर्ससारख्या ठिकाणी हॉकी स्टिक घेऊन धाडी घालण्याच्या कार्यपद्धतीमुळे ते वादग्रस्त ठरले होते. मात्र, मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त अरूप पटनाईक यांच्या बदलीनंतर नवे आयुक्त सत्यपाल सिंह यांनी काही तासांतच त्यांच्या अधिकारावर मर्यादा आणली होती. सामाजिक सेवा विभागात एसीपी म्हणून काम करताना ढोबळे संपूर्ण मुंबईत मुक्तपणे धाडी घालण्याचे काम करत होते. आता मात्र त्यांचे कार्यक्षेत्र हे केवळ वाकोला डिव्हिजिनच्या दोन पोलीस स्टेशनपुरते मर्यादित ठेवण्यात आले आहे.

पोलिस विभागातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गृहविभागाने काल रात्रीच्या सुमारास वसंत ढोबळे यांच्या बदलीचा आदेश काढला. पर्यटनाशीसंबधित एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आश्वासन दिले होते, की मुंबईला पुन्हा नाईट लाइफ मिळवून दिले जाईल. पोलिसांकडून होणारी अनावश्यक कारवाई रोखली जाईल. ढोबळेंची बदली करण्यावर चव्हाण यांनी भर दिला होता, असे समजते.

वसंत ढोबळे यांनी गुन्हे शाखेला आपल्या कामाचा अहवाल द्यावा, असा आदेश मुंबईचे नवनियुक्त पोलिस आयुक्त सत्यपालसिंह यांनी गेल्या महिन्यात दिला होता. त्यापूर्वी ढोबळे थेट मुंबईचे पोलिस आयुक्त अरुप पटनायक यांना आपल्या कामाचा अहवाल देत होते.

Leave a Comment