यंदा द्राक्ष उत्पादनात घट

पुणे दि.१७ – उशीरा आलेल्या आणि पुरेशा प्रमाणात न पडलेल्या पावसामुळे यंदा राज्यातील द्राक्ष उत्पादनात लक्षणीयरित्या घट होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत असून यंदा द्राक्षांची क्वालिटीही घसरेल असा अंदाज कृषीतज्ञ व्यक्त करत आहेत.

महाराष्ट्रात सांगली, पुणे, नाशिक, सातारा व नगर हे जिल्हे द्राक्षोत्पादनात अग्रेसर आहेत. मात्र यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने द्राक्षबागा सांभाळताना शेतकर्‍यांची चांगलीच त्रेधा उडाली होती. अनेक ठिकाणी बागा जगविण्यासाठी टँकरने पाणी पुरवावे लागले यामुळे शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च वाढला. अर्थात गेल्या कांही दिवसांत झालेल्या पावसाने बागांना जीवदान जरूर मिळाले आहे मात्र उत्पादन घटणार आहे तसेच द्राक्षांची गुणवत्ताही घसरणार असल्याचे फळबाग विभागातील अधिकार्‍यांनी सांगितले.

परिणामी यंदा द्राक्षांची निर्यातही कमी होईल व त्यामुळे शेतकर्‍यांना मिळणारा नफाही घटेल असे द्राक्ष बागायतदार संघातील सदस्यांचेही म्हणणे आहे. नाशिक जिल्हातील येवला, निफाड, पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन, लोणी, सांगली जिल्ह्यातील जत, कवठे महांकाळ, विटा, आटपाडी, तर सातारा जिल्ह्यातील कोरेगांव, दहीवडी या गावांना कमी पावसाचा फटका बसला असून या भागातील द्राक्षे दर्जेदार समजली जातात. मात्र यंदा द्राक्षे कमी प्रतीची येतील असे शेतकरीही सांगत आहेत.

Leave a Comment