मुंबई स्थलांतरीत प्रश्नामागे निव्वळ राजकारण ?

मुंबई दि१७ – मुंबईत परप्रांतातून आलेल्या स्थलांतरीतांमुळे गुन्हेगारी वाढत चालल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे करत असले आणि मुंबईत यापुढे स्थलांतरीतांना येऊ देणार नसल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात मुंबईतील स्थलांतरीतांत ७० टक्के लोक महाराष्ट्राच्या अन्य भागातूनच स्थलांतरीत होऊन आले आहेत असे नॅशलन सँपल सर्व्हे ऑरगनायझेशनने वेळोवेळी केलेल्या सर्वेक्षणातून दिसून येत असल्याचे समजते. त्यामुळे स्थलांतरीतांचा मुद्दा हे केवळ राजकारण आहे असे मत लोकसंख्या तज्ञ व्यक्त करत आहेत.

मुंबईत स्थलांतरील होऊन आलेल्या राज्यातील अन्य भागांच्या स्थलांतरीतांच्या तुलनेत परराज्यातून आलेल्यांचे प्रमाण तीनस एक असे आहे. १००० मागे ३७० अन्य प्रांतीय स्थलांतरीत असले तरी त्यातील १९८ महाराष्ट्राच्या सीमाभागातील आहेत. अर्थात मुंबईत येणारे स्थलांतरीत केवळ रोजगारासाठी येतात असे नाही तर त्याची अन्य कारणेही आहेत. विशेष म्हणजे नागरी व ग्रामीण भागातून होणार्‍या १००० पैकी ५३८ महिला आहेत आणि त्या लग्न होऊन इकडे आलेल्या आहेत.

स्थलांतरीत तज्ञ म्हणून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये कार्यरत असलेले डी.पी.सिंग यांच्या मते रत्नागिरी आणि सिधुदुर्ग भागातून मुंबईत येणार्‍यांची संख्या मोठी आहे तसेच विकासाविना राहिलेल्या मराठवाड्यातून येणारेही अधिक आहेत. अर्थात मुंबईतील रोजगार संधीही घटत चालल्या आहेत कारण मुख्य रोजगार पुरविणार्‍या कापड गिरण्या बंद पडल्या आहेत व नवीन उत्पादन प्रकल्प मुंबईत सुरूच झालेले नाहीत. सध्या रोजगारासाठी बांधकाम क्षेत्र हेच एकमेव आकर्षण आहे. त्यामुळे मुंबईतील स्थलांतर स्थिर पातळीवर असून ते वाढलेले नाही. बिहारी मुंबईत येण्याबद्दल जी चर्चा होते आहे त्यात बिहारी प्रामुख्याने दिल्ली व पंजाब राज्यात रोजगारासाठी जातात व त्यानंतर महाराष्ट्रात येतात. महाराष्ट्रात बिहारी येण्याचे प्रमाण ८ टक्के असून दिल्लीत ते २५ टक्के आहे हे विचारात घेतले पाहिजे.

Leave a Comment