
पुणे दि.१७- पुण्यातील गणेशोत्सवाचे आकर्षण असलेल्या ढोलपथकांकडे परदेशी युवक युवतीही ओढले जात असून सध्या शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या या ढोलपथकांच्या सरावात हे परदेशी लोकही सहभागी होताना दिसत आहेत. ढोलताशांच्या आवाजाने मोहित झालेले हे युवक यंदाच्या गणेशोत्सवात आपापल्या पथकांकडून वादनात सामील होणार आहेत. ड्रम वादनाशी परिचित असलेल्या या परदेशी मुलांना ढोल ताशांचे पारंपारिक नाद आपल्या घराची आठवण करून देत आहेत. केवळ ढोल वाजवायला शिकणे इतकाच त्यांचा उद्देश नाही तर ही मुले मराठी परंपरा आणि संस्कृतीबाबतही अधिक जाणू घेऊ इच्छित आहेत आणि त्यासाठी मराठी शिकत आहेत.
नेदरलँडहून आलेला सिवा रिस्कॉफ डेप्युटेशनवर भारतात व त्यातही पुण्यात आला आहे. त्याच्या देशात घरी ड्रम वाजविण्याचा त्याला सराव आहे. मात्र जगाच्या आर्थिक सत्तेकडे वाटचाल करत असलेल्या भारताची परंपरा आणि संस्कृती याविषयीही आता त्याला उत्सुकता वाटत आहे. त्यासाठी तो मराठी शिकतो आहे. रिस्कॉफ सांगतो, कामावरून परत येत असताना ढोलाचे आवाज माझ्या कानावर पडले व मित्राला हे कोणते वाद्य आहे असे विचारले. तेव्हा मित्राने या पथकांचा जेथे सराव सुरू होता तेथे मला नेले. पथकातील मुलामुलींचा जोश पाहून मलाही त्यात सहभागी व्हावेसे वाटले आणि मी गजलक्ष्मी ढोल ताशा पथकात सामील झालो. गेले दोन आठवडे मी सराव करत असून यंदाच्या गणेशोत्सात मी ढोल वाजविणार आहे. ढोल वाजविताना आपण योद्धा आहोत अशी वीरश्री माझ्या अंगात भिनते याचा अनुभव मी घेत आहे असेही तो सांगतो. हा ठेका उत्साह आणि उर्जा वाढविणारा आहे.
