ज्योतिकाकुमारी बलात्कार व खून प्रकरणी फाशी कायम

पुणे: बीपीओमधील महिला कर्मचाऱ्यावर अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी कंपनीचा कंत्राटी वाहनचालक आणि त्याच्या मित्राला जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे.

दि. १ नोव्हेंबर २००७ रोजी विप्रो बीपीओ कंपनीचा वाहनचालक पुरुषोत्तम बोराटे आणि त्याचा मित्र प्रदीप कोकाटे या दोघांनी कंपनीतील कर्मचारी ज्योतिका कुमारी हिच्यावर बलात्कार करून तिचा गळा आवळून खून केला. ओळख नष्ट करण्यासाठी तिचा चेहेरा विद्रूप केला आणि तिचा मृतदेह मुंबई पुणे महामार्गावर वडगाव येथे टाकून दिला. या दोघांना सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.

आरोपींच्या वतीने या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. आरोपींची गुन्हेगारी पर्श्वभूमी नसल्याने त्यांना सुधारण्याची संधी द्यावी; असा युक्तिवाद आरोपींच्या वतीने करण्यात आला. मात्र या गुन्ह्यामागील क्रूरता आणि सामाजिक परिणामाचा विचार करून उच्च न्यायालयाचे न्या. व्ही. एम. कानडे आणि न्या. पी. डी. कोदे यांच्या खंडपीठाने फाशीची शिक्षा कायम केली.

Leave a Comment