महाराष्ट्र शासनाने गुटखा बंदीचा निर्णय घेऊन आता दोन महिने झाले आहेत. हा निर्णय योग्य आहे पण त्याला न्यायालयाचा हिरवा कंदिल मिळतो की नाही असा प्रश्न पडला होता. चार वर्षांपूर्वीही अशीच बंदी करण्यात आली होती आणि न्यायालयाने हिरवा बावटा न दाखवल्यामुळे बारगळली होती. आताही न्यायालयाने मागच्या सारखीच भूमिका घेतली असती आणि सरकारच्या विरोधात निकाल दिला असता तर पुन्हा एकदा ही बंदी बारगळली असती. पण तसे झाले नाही कारण गेल्या वेळी दिलेला निर्णय वेगळा होता. तो गुटख्याच्या बाजूने आहे असे वाटले होते पण तो सरकारच्या ती बंदी लागू करण्याच्या पद्धतीच्या विरोधात होता. न्यायालयाला बंदी मान्य होती. आता यावेळी तसा काही मुद्दा समोर आला नाही. गुटखा बंदी योग्य की अयोग्य असा थेट प्रश्न आला आणि आता उच्च न्यायालयाने गुटखा बंदीवर शिक्कामोर्तब केले. आता अर्जदार गुटखा निर्मात्यांना केवळ सर्वोच्च न्यायालयाचाच मार्ग शिल्लक आहे.
प्रत्येक माणसाला आपले पोट भरण्यासाठी आणि चांगले जीवन जगण्यासाठी पैशांची गरज असते आणि त्यासाठी काही तरी व्यवसाय करावाच लागतो पण आपला व्यवसाय कोणता असावा याबाबत प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आपल्या आयुष्यात अशा काही घटना घडतात की त्यामुळे आपल्याला अपघाताने व्यवसाय निवडावा लागतो. काही वेळा आपल्याला मनात नसताना आणि आवड नसताना कोणता तरी व्यवसाय निवडणे भाग पडते. पण प्रत्येकाने शक्यतो चांगला व्यवसाय निवडला पाहिजे आणि तो चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. काही लोकांना चांगला व्यवसाय मिळतो पण ते लोक तो व्यवसाय चांगल्या प्रकारे करीत नाहीत. काही लोकांचा मुळात व्यवसायच चांगला नसतो. तो व्यवसाय म्हणजे एखादे व्यसन असते. त्याने त्यांचे पोट भरत असेल आणि त्यांना चांगला पैसाही मिळत असेल पण मुळात त्या व्यवसायाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असतील तर अशा व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायात बदल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काही लोकांचा व्यवसाय दारू गाळण्याचा असतो तर काहींचा गुटखा तयार करण्याचा असतो. अशा लोकांनी आपल्या व्यवसायाचा कधी तरी विचार केला पाहिजे. कारण आपला पैसा कमवण्याचा धंदा हाच कोणाच्या तरी संसाराची धुळधाण करणारा असेल तर मग आपल्याला त्या धंद्यातून पैसा मिळेल पण समाधान मिळणार नाही. संसार उद्ध्वस्त होणारे अनेक लोक अशा व्यावसायिकांना कधी ना कधी तरी शिव्याशाप देतच असतील ना ? मग आपण अशा शाप मिळणारा धंदा करण्याऐवजी लोकांचे आशिर्वाद मिळतील असा धंदा का करू नये असे आत्मचितन त्यांनी करायला हवे.
हे सारे महाराष्ट्रातल्या गुटखा मालकांसाठी लिहीत आहे कारण हे लोक गुटखा तयार तर करीत आहेतच पण वारंवार कोर्टात धाव घेऊन आपण लोकांना पुरवत आहोत ते व्यसन नसून अन्न असल्याचे दावे करीत आहेत. महाराष्ट्र शासनाने गुटखा बंद केला तरीही हे लोक न्यायालयात जाऊन ही बंदी उठवण्यासाठी नाना प्रकारचे युक्तिवाद करीत आहेत. पण काल उच्च न्यायालयाने या लोकांचे हे युक्तिवाद फेटाळून लावले. आता त्यांना केवळ सर्वोच्च न्यायालयाचा एक मार्ग शिल्लक राहिलेला आहे. खरे तर या लोकांकडे आता बराच पैसा आहे. त्यांना गुटखा सोडून अन्य कोणतेही चांगले व्यवसाय करता येतात. त्यांना तशी संधीही आहे. त्यांनी आता लोकांचे जीवन बरबाद करणार्या वस्तू तयार करण्याऐवजी ते उज्ज्वल करणार्या वस्तू तयार कराव्यात.
अशा लोकांचे एक वैशिष्ट्य असे आहे की ते हा व्यवसाय वगळता सर्वत्र कमालीचे धार्मिक असतात. ते मंदिरांना देणग्या देतात. अनेक अनाथाश्रमांना अनुदाने देतात. धार्मिक उत्सवांना हजेरी लावतात. तिथे हजारो लोकांना अन्नदान करतात आणि त्यामुळे आपली स्वर्गातली जागा फिक्स होत असते असा त्यांचा समज असतो. यातला दानधर्म चांगलाच असतो पण त्यांना धर्माचे मर्म कळलेले नसते असे खेदाने नमूद करावेसे वाटते. त्यांचे उपजीविकेचे साधन हाच मुळात अधर्म असतो. मग तो धंदा ते सचोटीने करीत असतील आणि त्यातून ते लाखो रुपये दान करीत असतील तरी त्या दानात नक्कीच पुण्य नाही हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. त्यांनी उपजीविकेचे साधन बदलावे. तो धंदाही सचोटीने करावा. त्यातून आलेले पैसे कमी असतील तर त्यातून दानधर्म करू नये. तो पैसा वापरून आपले जीवन साधेपणाने जगावे. त्यात अधिक पुण्य आहे. त्या अवस्थेत त्यांनी दान कले नाही तरी चालेल. उच्च न्यायालयाने त्यांना धुडकावले आहेच पण नंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा मुद्दा मान्य केला तरीही त्यांनी मुळात पापाचा असलेला हा धंदा सोडून द्यावा.