आणखी तीव्र कार्टून काढणार- असीम त्रिवेदी

कानपूर दि, १७ – संसद, भारतमाता विषयावरील कार्टून काढल्याने राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्या असीम त्रिवेदी या २५ वर्षीय कार्टूनिस्टने तुरूंगातून बाहेर आल्यावर यापेक्षाही अधिक तीव्र भावना व्यक्त करणारी कार्टून काढणार असल्याचे जाहीर केले आहे. भ्रष्टाचार निर्मूलन व्हावे म्हणून प्रयत्नशील असलेल्या असीमने अण्णा हजारे यांचा दाखला दिला आहे. तो म्हणतो अण्णा म्हणतात की देशासाठी तुरूंगवास भोगावा लागला तर तो मायभूमीचा आशीर्वाद मानला पाहिजे. मीही भ्रष्टाचाराच्या कीडीपासून माझ्या देशाचे संरक्षण व्हावे म्हणून ही कार्टून काढतो आहे त्यामुळे मला त्याचा पश्चाताप होत नाही आणि तुरूंगात जायला मी घाबरतही नाही.

मुंबई उच्च न्यायालयाने जामीनावर असीमला मुक्त केल्यानंतर तो प्रथमच त्याच्या मूळगांवी म्हणजे शुल्कगंज येथे जाण्यासाठी रविवारी कानपूर रेल्वे स्थानकावर उतरला तेव्हा त्याच्या स्वागताला त्याचे आईवडील आणि असंख्य समर्थक उपस्थित होते. असीमची मिरवणूकही काढण्यात आली. त्यावरूनच देशातील नेतृत्त्व आणि भ्रष्टाचाराबाबत जनमानसात किती राग आहे याचे प्रत्यंतर आले. यापुढेही व्यंगचित्रे साकारतच राहणार असे असीमने यावेळी जाहीर केले.

आरपीआयच्या एका कार्यकर्त्याने असीमविरोधात दाखल केलेल्या याचिकेवरून मुंबई पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र सर्वच थरातून राष्ट्रद्रोहाचे कलम लावल्याप्रकरणी सरकार आणि पोलिसांवर टीका झाली. तसेच राष्ट्रद्रोहाचे कलम मागे घेतले जात नाही तोपर्यंत जामीन न घेण्याचा निर्णय असीमने घेतला होता. अर्थात या सर्व प्रकारामुळे असीम एकदमच चर्चेत आला आणि पंधरा मिनिटात हिरो बनला.

Leave a Comment