काँग्रेस, तृणमूलमध्ये समजुतीचे प्रयत्न

नवी दिल्ली: आम्ही आमच्या सहयोगी पक्षांच्या मर्यादा आणि अगतिकता लक्षात घेतो त्याचप्रमाणे त्यांनीही आमचा विचार करावा; अशी अपेक्षा काँग्रेस प्रवक्त्या रेणुका चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. डीझेल दरवाढ आणि सिलेंडरच्या रेशनिंगप्रकरणी नाराज असलेल्या तृणमूल काँग्रेसबरोबर चर्चा सुरू असून संयुक्त पुरोगामी आघाडी अखंड राहील; असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

तृणमूल कॉंग्रेसने डीझेल दरवाढ, सिलेंडर रेशनिंग आणि रिटेल क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीबाबत फेरविचार करण्यासाठी दिलेली मुदत सोमवारी संपुष्टात आली. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस या दोघांमध्येही आगामी रणनीती ठरविण्याबाबत खलबते सुरू आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ए. के. अंथोनी, पी. चिदंबरम, सुधीलाकुमार शिंदे, गुलाम नबी आझाद, वायलर रवी या ज्येष्ठ मंत्र्यांसह राजकीय सचिव अहमद पटेल यांच्याशी चर्चा केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक मंगळवारी कोलकाता येथे बोलाविली आहे.

आमची दारे सदैव चर्चेसाठी खुली असून संपुआमधील सर्व पक्ष एकत्र राहतील आणि सरकारमध्येही असतील; अशी आशा चौधरी यांनी व्यक्त केली. मात्र कोणतीही चर्चा एकतर्फी होत नाही; हे त्यांनी स्पष्ट केले. डीझेल दरवाढ आणि सिलेंडरचे रेशनिंग याबाबत अंशत: माघार घेण्यास काँग्रेस तयार आहे का; या पश्नाला मात्र त्यांनी बगल दिली. देशाच्या प्रगतीबाबत कोणतीही तडजोड होणार नाही; असे सांगतानाच; ‘मोडू पण वाकणार नाही;’ अशी गर्जनाही त्यांनी केली.