वेरूळ – भारतीय कला संस्कृतीचा वारसा
भारतीय कला संस्कृतीचा खरा सांस्कृतिक वारसा जाणून घ्यायचा असेल तर औरंगाबाद जवळच्या वेरूळ लेण्याला भेट द्यावी लागेल. बेसाल्टसारख्या भक्कम दगडात कोरलेली ही लेणी दोन किलोमीटरच्या परिसरात पसरलेली आहेत पण त्याचे सर्वात आगळे आणि महत्त्वाचे वैशिष्ठ म्हणजे तीन विविध धर्मांचे प्रतिनिधित्व ही लेणी करतात. त्यावरून प्राचीन काळापासूनच भारतवर्षात सर्वधर्मसमभाव आणि धार्मिक एकोपा कसा होता याचे सुंदर दर्शन घडते. ३४ गुहांमधून अज्ञात कलाकारांच्या अथक परिश्रमातून घडलेली ही लेणी हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मांचे प्रतिनिधित्व करतात. अर्थात सर्वात अग्रणी आहे कैलास लेणे.

सह्याद्रीच्या पर्वतरांगातील खडकांत कोरलेले हे लेणे म्हणजे जगातील एकमेव एकसंध मोठे स्ट्रक्चर आहे. कळसापासून पायाकडे खोदले गेलेले हे लेणे अनेक राजघराण्यांनी मदत करून पुरे केले असे सांगितले जाते कारण या लेण्याचे काम पाचशे वर्षे सुरू होते. म्हणजे कलाकारांच्याही कितीतरी पिढ्या आणि राजघराण्यांचीही कित्येक पिढ्या त्या काळात झालेल्या असणार. ५००ए.डी ते १००० एडी असा याचा काल सांगितला जातो. या लेण्यासंबंधी जे शिलालेख मिळाले आहेत त्यातूनही अनेक मनोरंजक आणि कौतुकास्पद गोष्टी समजतात. शिलालेखातील मजकुरानुसार राजा कृष्ण पहिला याने या लेण्याचे काम सुरू केले. आकाशातून जाणारे देव यक्ष वगैरे हे लेणे आकाशातून जाताना दिसले की थांबून ते पहात असत आणि खरेच मानवाने हे बांधले का असा प्रश्न त्यांना पडत असे असेही हा शिलालेख सांगतो.

३४ लेण्यापैकी पहिल्या १२ बौद्ध लेण्या आहेत. या पाचव्या व सातव्या शतकांत खोदल्या गेल्या. अनेक मजली राहण्याच्या जागा, प्रार्थनास्थळे आणि बुद्ध बोधिसत्वाचे पुतळे येथे पाहायला मिळतात. मॉनेस्ट्रीज म्हणूनही या लेण्यांचा वापर केला जात होता. १० क्रमांकाच्या गुहेत बोधिसत्त्वाचा सुंदर पुतळा असून विश्वकर्मा सुताराचे हे लेणे म्हणून ओळखले जाते. याचे सिलींग लाकडाचे असल्याचा भास होतो. येथेही दोन मजले दगडातूनच कोरून काढले आहेत.

१२च्या पुढच्या १७ लेण्या हिंदू लेण्या म्हणून ओळखल्या जातात. वेगळी वास्तुशैली चटकन लक्षात येणारी. प्रत्येक गुहेत कोरलेली डिझाईन्स अतिशय अवघड आणि वेगवेगळ्या थीम वापरून कोरलेली आहेत. मात्र यातील मुकुटमणी म्हणजे कैलास लेणे. हिमालयातील कैलास पर्वताचे साम्य असलेले हे लेणे अखंड दगडातून कोरले गेले आहे. कलाकारांच्या अनेक पिढ्या या लेण्याच्या कामी खर्ची पडल्या. दगडातून येथे पुराणातील अनेक कथा कोरून जिवंत केल्या गेल्या आहेत. लेण्याच्या पायाशी हत्ती कोरलेले असून त्यांच्या पाठीवर असलेल्या मंडपात नंदी आहे. मुख्य मंदिरासमोर मध्यभागी दगडी पुलाच्या सहाय्याने नंदी व मंदिर जोडलेले आहे. त्यात अनेक प्रतीकांचा सुंदर वापर केला गेला आहे. रावण कैलास पर्वत उचलतोय असाही एक सीन कोरलेला असून रावणाला हे उचलण्यासाठी पडत असलेले कष्ट त्याच्या मुद्रेवर स्पष्ट दिसतात.

दोन लाख टन वजनाचा हा खडक फोडून त्यातून कैलासाचे काव्य कोरण्याच्या त्या अज्ञात कलाकारांच्या प्रयत्नांना समस्त मानव जातीने लवून मुजराच करायला हवा. सतत १०० वर्षे हे कोरीवकाम चालू होते असे इतिहास सांगतो.

अन्य लेण्यांत विष्णूंचे दशावतार, त्यातही खांब फोडून बाहेर आलेला नरसिंह आणि हिरण्यकश्यपूचा केलेला वध प्रेक्षणीय.रामेश्वर, रावण की खाई, नीलकंठ अशी अन्य लेणीही आश्चर्याने पदोपदी थकक करणारी आहेत.

शेवटची जैन लेणी ही सर्वात शेवटीच निर्माण केली गेली आहेत. छोटा कैलास, इंद्रसभा, जगन्नाथ सभा अशी दगडातून जिवंत केलेली दृष्ये अत्यंत बारीक आणि नाजूक कलाकुसरीने युक्त आहेत. छतावर पेटींग्ज आहेत.
पावसाळ्यानंतर हा सारा परिसर हिरवागार होऊन जातो आणि छोटे छोटे धबधबे सृष्टीचे सौदर्य परिपूर्ण करून टाकतात. वेरूळ लेण्यांना भेट देण्यासाठी हा काळ खरोखरच चांगला. जाण्यायेण्यासाठी सोयी चांगल्या आहेत. मात्र ही लेणी मंगळवारी बंद असतात हे लक्षात घेऊनच प्रवासाचे वेळापत्रक आखावे हे उत्तम. तसेच लेणी पाहताना मार्गदर्शक अवश्य बरोबर घ्यावा.

