’राज ३’

जादू टोण्यावर आधारित राज या थरारपटात हिंदू मांत्रिक नायिकेला ख्रिश्चन स्मशानभूमीत घेऊन जातात. नायिकेवर काळ्या जादूचा प्रभाव आहे. मांत्रिक तिच्या हातावर एक ताईत बांधतो. काळ्या जादूपासून तिची सुटका व्हावी यासाठी मांत्रिक प्रयत्न करतो. या साहसी प्रक्रियेदरम्यान मांत्रिकाचे डोके धडापासून वेगळे होते. नायक-नायिका स्मशानभूमीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. हा एक भयावह अनुभव आहे.

या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत आहे इमरान हाश्मी. तर नायिका (ईशा गुप्ता) २००२ साली आलेल्या ’राज’मधील मृणालिनी शर्मासारखी वाटते. इमरान हाश्मी लगेचच नायिकेचे चुंबन घ्यायला सुरुवात करतो. या दृश्यादरम्यान रोमॅण्टिक म्युझिक सुरु होते. या दोघांमध्ये इंटीमेट सीन्स सुरु होतात. हे बघताना प्रेक्षकांना हसू येते. थरारपटात थरार दिसतच नाही.

चित्रपटाच्या सुरुवातीला एका पुरस्कार सोहळ्यात बिपाशा बसुला (सानिया शेखर नावाच्या आघाडीच्या नायिकेच्या भूमिकेत) सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार मिळणार अशी आशा आहे. मात्र तिची सावत्र बहीण आणि प्रतिस्पर्धी असेलल्या संजनाला (ईशा गुप्ता) हा पुरस्कार मिळतो. त्यामुळे सानिया शेखरचा तळतळाट होतो. पुरस्कार सोहळ्याबाहेर पडल्यानंतर सानियाला एक म्हातारा माणूस काळ्या जादूबद्दल सांगतो. तो तिला बॉयफ्रेंडच्या (इमरान हाश्मी या चित्रपटात दिग्दर्शकाच्या भूमिकेत आहे) मदतीने काळ्या जादूच्या माध्यमातून आपल्या प्रतिस्पर्धीचा नायनाट करण्याचे सुचवतो.

सहसा हॉरर चित्रपटांमध्ये बर्‍याच अविश्वसनीय गोष्टी असतात. एका दृश्यात काळ्या जादूमुळे नायिकेच्या (ईशा गुप्ता) अंगावर झुरळांचा हल्ला होताना दाखवण्यात आले आहे. त्यामुळे भर पार्टीत तिला विवस्त्र व्हावे लागते. प्रेक्षक या दृश्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यांना हसू आवरता येत नाही.
एकंदरीत हा सिनेमा धड नाही भयपट आणि धड नाही विनोदी अश्या कात्रीत सापडला आहे.

Leave a Comment