उद्योजकताविषयक अभ्यासक्रम

edu

देशाची प्रगती नेमकी कशाने होते आणि कोणता देश खरा मोठा मानला जातो याची चर्चा बर्‍याचवेळा होत असते. परंतु देशाची औद्योगीकरण होण्याच्या या काळामध्ये देश खर्‍या अर्थाने मोठा होत असेल तर तो देशातल्या उद्योजकतेमुळे होत असतो. आपल्या देशात नवे उद्योग उभारताना आणि परदेशी भांडवल आकृष्ट करताना देशात निर्माण होणार्‍या नोकर्‍यांवरच लक्ष दिले जाते. म्हणजे आपण आपल्या देशातल्या तरुणांना दुसर्‍या देशाच्या उद्योगपतींचे नोकर बनवत असतो.

मात्र आपल्याच देशातल्या तरुणांनी मोठे उद्योग का उभे करू नये, असा प्रश्‍न आपल्याला पडतच नाही. तशी आपल्या तरुणांची क्षमता नाही असेही काही नाही. अगदी सामान्य परिस्थितीतून उठून उद्योगपती झालेले अनेक लोक या देशामध्ये आहेत. धीरूभाई अंबानी यासारख्या उद्योगपतीचे उदाहरण तर वारंवार दिले जात असते. धीरुभाई अंबानी सामान्य स्थितीतून करोडपती झाले, मात्र आपल्या देशामध्ये अन्य कोणी अंबानी नाहीतच असे नाही.

गावागावांमध्ये अंबानी होण्याची क्षमता असलेले तरुण आहेत आणि त्यांच्यामध्ये उद्योजक प्रवृत्ती ओतप्रोत भरलेली आहे. परंतु तिला कोणी आकार देत नाहीत, पैलू पाडत नाहीत. त्यामुळे त्याला स्वत:च्या उद्योजकतेचा आविष्कार घडविण्याची संधी मिळत नाही. अशा तरुणांना शिक्षण दिले तर हे तरुण प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून उद्योगपती म्हणून उभे राहतील, अनेक नोकर्‍या निर्माण करतील आणि देशाचा विकास घडवतील.

असे असले तरी उद्योजकतेचे प्रशिक्षण देणार्‍या आणि उद्योजक घडवणार्‍या संस्था देशामध्ये अपवादानेच आढळतात. आर्टस्, कॉमर्स, सायन्स, इंजिनअरींग, मेडिकल, व्यवस्थापन शास्त्र अशा अनेक पदव्या देणारी महाविद्यालये आता गल्लोगल्ली निघाली आहेत. मात्र देशाच्या विकासाला आवश्यक असा उद्योजकता विकासाचा अभ्यासक्रम आपण सुरू करावा अशी कल्पकता यातल्या फार कमी संस्थांनी दाखवली आहे. अशा अभ्यासक्रमांची संख्या वाढण्याची खरी गरज आहे. भारतातल्या काही जाणकार आणि दूरदृष्टीच्या शिक्षण तज्ज्ञांनी मात्र फार पूर्वी याचा विचार केलेला आहे.

अहमदाबाद येथील एन्टरप्रुनरशीप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (ई.डी.आय.) या संस्थेत मात्र उद्योजकतेचा अतिशय सविस्तर अभ्यास करणारा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे. या संस्थेची एक शाखा बंगळूरमध्ये सुद्धा आहे. तिचा पत्ता – ई.डी.आय., १२ वा मेन रोड, पाचवा ब्लॉक, डॉ. राजकुमार रोड, राजाजी नगर, बंगळूर. ५६० ०१०. फोन : २३११९३६० असा आहे.

उद्योजकता विकास हा मनुष्यबळ विकासाचाच एक भाग आहे आणि अलीकडच्या काळात एम.बी.ए.च्या पदव्या देणार्‍या अनेक अभ्यासक्रमांमध्ये मनुष्य बळ विकासाबरोबरच उद्योजकता विकासाच्याही अभ्यासक्रमांना चालना देण्यात आली आहे. या विषयाचे महत्व लक्षात आल्यानंतर यातल्या काही संस्थांनी एम.बी.ए. नंतर एक वर्षाचा केवळ उद्योजकता विकासाला वाहिलेला पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे. ही पदव्युत्तर पदविका देणार्‍या संस्था बंगळूर आणि मुंबईमध्ये बर्‍याच प्रमाणात आहेत. भारतीय विद्या भवन या संस्थेने असा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. पत्ता – रेसकोर्स रोड, बंगळूर फोन नं. २२२६५७४६ असा आहे.

या विषयाचे महत्व ओळखून सोलापूरच्या लोकमंगल समूहाच्या श्रीराम शिक्षण संस्थेने सुद्धा बी.एस्सी. (उद्योजकता) हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. संस्थेचा पत्ता- श्रीराम शिक्षण संस्था, वडाळा, ता. उत्तर सोलापूर. जि. सोलापूर असा आहे. सध्या उद्योजकतेचे महत्व देशाच्या विकासासाठी तर आहेच पण अनेक ठिकाणी हळू हळू उद्योजकता विकासाचे खाजगी प्रशिक्षण कार्यक‘म सुरू होत आहेत. महाराष्ट्रात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम.सी.ई.डी.), मिटकॉन अशा संस्था या प्रशिक्षणात आघाडीवर आहेत.

मात्र या संस्थांकडे उद्योजकता विकासाचे किंवा मनुष्य बळ विकासाचे शिक्षण घेतलेले तज्ज्ञ मार्गदर्शक नाहीत. त्यामुळे या विषयावर अर्धवट ज्ञान असलेल्या लोकांकडून प्रशिक्षण दिले जाते. अशा संस्थांमध्ये उद्योजकतेचे शिक्षण घेतलेल्या तज़्ज्ञांची फार वानवा आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी माणसे आता उद्योगाकडे वळायला लागली आहेत. परंतु उद्योगातल्या सर्व खाचाखोचा त्यांना माहीत नाहीत. अशा लोकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा हा अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या तज्ज्ञांची गरज आहे. एकंदरीत उद्योजकता विकासाची पदवी घेणार्‍यांना भरपूर संधी आहे.

Leave a Comment