माजी सरसंघचालक सुदर्शन यांचे निधन

नागपूर दि.१५- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक के. सुदर्शन यांचे आज म्हणजे शनिवारी रायपूर येथे सकाळी साडेसहाच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. सुदर्शन यांचे पार्थिव आज दुपारी नागपूर येथे आणण्यात येत असून रविवारी दुपारी साडेतीन वाजता त्यांच्यावर नागपूर येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

के. सुदर्शन म्हणजेच कुप्पली सीतारामय्या सुदर्शन यांनी २००० ते २००९ या काळात सरसंघचालक म्हणून जबाबदारी पार पाडली होती. १८ जून ३१ रोजी त्यांचा जन्म झाला होता. ते टेलीकम्युनिकेशन इंजिनिअर होते. सरसंघचालकपदावर नियुक्ती होण्याअगोदर त्यांनी संघाच्या विविध विभाग प्रमुखपदाच्या जबाबदार्‍या पार पाडल्या होत्या. संघाच्या शारीरिक व बौद्धिक असे दोन्ही विभाग सांभाळणारे ते एकमेव सरसंघचालक होते. गेले काही दिवस त्यांची प्रकृती बरी नव्हती व त्यांना स्मृतिभ्रंशाचाही त्रास होत होता.

संघात नव्या युवा नेतृत्वाला संधी दिली गेली पाहिजे असे त्यांचे मत होते आणि त्या दृष्टीने त्यांनी कांही धोरणे आखलीही होती. त्यावर त्यांना टीकेला सामोरेही जावे लागले होते. त्यांच्या निवृत्तीनंतर सरसंघचालकपदाची सूत्रे डॉ.मोहन भागवत यांनी स्वीकारली.

Leave a Comment