कंदहार प्रकरणातील मेहरूद्दीनची दाऊद संबंधांची कबुली

नवी दिल्ली दि.१५ – कंदहार अपहरण प्रकरणातील प्रमुख आरोपी मेहरूद्दीन याने पोलिस चौकशीत त्याचे दाऊद व त्याच्या भावाबरोबर घनिष्ट संबंध असल्याची व त्यांच्यासाठी अनेक कामे पार पाडल्याची कबुली दिली आहे. मेहरूद्दीन याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून त्याच्याजवळ अन्य कागदपत्रांसह सापडलेल्या डायरीतूनही आणखी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता पोलिस अधिकारी वर्तवित आहेत.

मेहरूद्दीनला जम्मू काश्मीर पोलिसांनी किश्तवाड जिल्ह्यात अटक केली होती. तो नेपाळ येथे वास्तव्यास होता आणि तेथे तो हिंदू नावाने राहात होता. त्याने हिदू मुलीशी लग्नही केले होते. प्रकृती बिघडल्याने तो आपल्या मूळ गांवी किश्तवाड येथे आला होता असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दिल्लीतील लजपतनगर बॉम्बस्फोटात त्याचा हात होता तसेच युनायटेड जिहादी कौन्सिलचा प्रमुख सईद सलाऊद्दीन याच्याशीही त्याचा जवळचा संबंध होता. पाकिस्तानात १९८७ साली शस्त्रास्त्र प्रशिक्षणासाठी जे पहिले पाच जिहादी पाठविण्यात आले होते त्यात मेहरूद्दीनचा समावेश होता. गेले काही दिवस तो स्वतंत्र रित्याच अनेक दहशतवादी संघटनांसाठी कामे करत आहे असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

Leave a Comment