…तर पाठींबाही काढू: तृणमूल काँग्रेस

नवी दिल्ली: डीझेल दरवाढ आणि रिटेल क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीला मान्यता या निर्णयांचा पुर्नविचार करण्यास तृणमूल काँग्रेसने सरकारला ७२ तासांचा कालावधी दिला आहे. या काळात सरकारने ही जनताविरोधी धोरणे मागे घेतली नाहीत; तर आम्ही कोणताही निर्णय घेण्यास स्वतंत्र आहोत; असा इशाराही तृणमूलने दिला आहे.

तृणमूल काँग्रेस संसदीय पक्षाची तातडीची बैठक दि. १८ सप्टेंबर रोजी बोलाविण्यात आली आहे. सरकारचे डीझेल दरवाढ आणि रिटेल क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीचे निर्णय आम्हाला मान्य नाहीत. हे निर्णय रद्द न झाल्यास कोणत्याही टोकाला जाण्याचे आमची तयारी आहे. पाठींबा काढून घेण्यास एका क्षणाचा अवधीही पुरेसा आहे. मात्र राजकीय अस्थिरता निर्माण केल्याचे खापर आमच्या माथ्यावर नको यासाठी आम्ही सरकारला मुदत देत आहोत; असे तृणमूल काँग्रेस खासदार कुणाल घोष यांनी सांगितले.

Leave a Comment