ड्रेनेजमधील पाण्यावर चालेल कार

टोकियो – पेट्रोलचे  दर कितीही वाढूदेत .चिंता करायचे कारण नाही. का? अहो, अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार येणार्‍या तीन वर्षात पेट्रोलची दरवाढ ही समस्या राहणार नाही. येत्या तीन वर्षात गाड्या पेट्रोलऐवजी गटारातील पाणी अर्थात  सीवेजवर चालतील. जपानी कार उत्पादक कंपनी या योजनेवर काम करीत आहे. त्यांनी केलेल्या प्रयोगानुसार मलजल इंधन म्हणून वापरले जाऊ शकेल. या प्रक्रियेअंतर्गत सीवेजला हाइड्रोजनमध्ये परिवर्तित करून ते इंधन सेल वाहनात वापरले जाऊ शकेल.

जपानच्या निकेई बिझिनेस डेलीनुसार इलेक्ट्रिक सेल वाहनांच्या तुलनेत हे जास्त प्रभावी सिद्ध होईल. एरवी हाइड्रोजन निर्माण करण्याची परंपरागत पद्धत खूप महागडी आणि कठीण आहे. मात्र सीवेजद्वारे हाइड्रोजन बनविणे अधिक स्वस्त आहे. तसेच ते पर्यावरणाच्या दृष्टीनेही उत्तम आहे.

स्टफ डॉट को डॉट एनजेडच्या वृत्तानुसार , या प्रक्रियेद्वारे कार्बनचे ७५ टक्के उत्सर्जन रोखले जाऊ शकेल. या प्रक्रियेत मलजल सुकवून त्यातून मिथेन गॅस निर्माण केला जाईल. नंतर हा गॅस पुन्हा गरम करून त्यातून उच्च सांद्रित हाइड्रोजन गॅस मिळवला जाऊ शकेल. हे तंत्र २०१५ पर्यंत पूर्णपणे विकसित करण्याची योजना आहे.

Leave a Comment