काँग्रेसला सहयोगी पक्षांनी घेरले

नवी दिल्ली: डीझेल दरवाढ आणि वर्षाला ६ सिलेंडर देण्याच्या निर्णयावरून संयुक्त पुरोगामी आघाडीच्या घटक पक्षांमध्ये रणकंदन माजण्याची चिन्हे आहेत. डीझेल दरवाढ आणि सवलतीच्या दरात वर्षात केवळ ६ सिलेंडर देण्याच्या निर्णयावरून महागाईने पिचलेल्या जनतेच्या मनात क्षोभ निर्माण झाला आहे. त्याचे पडसाद राजकीय पक्षांमधेही पहावयास मिळत आहेत.

आघाडीत राहून दादागिरी करणार्‍या ममतादिदींनी सरकारला ही दरवाढ आणि सिलेंडरवरील निर्बंध हटविण्याचे फर्मान सोडले असून तसे न केल्यास शनिवारी महामोर्चा काढण्याचा इशाराही दिला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्याबरोबरच संपुआमधील द्रविड मुन्नेत्र कळघमच्या अध्यक्षा जयललिता यांनीही या निर्णयाला आपला विरोध व्यक्त केला आहे.

सरकारला बाहेरून पाठींबा देणार्‍या समाजवादी पक्षाने काँग्रेसशी काडीमोड घेण्याचा निर्णय जाहेर केला असतानाच त्यांनाही या निर्णयामुळे एक निमित्तच मिळाले आहे. सर्वत्र महागाईचा आगडोंब उसळलेला असताना या निर्णयाने आगीत तेल ओतले जात असल्याचा आरोप करून त्याच्या निषेधार्थ सपच्या वतीने उत्तर प्रदेशातील सर्व जिल्हा मुख्यालयांवर मोर्चे काढले आहेत.

प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि डाव्या पक्षांनीदेखील सरकारचा हा निर्णय जनता विरोधी असल्याचा आरोप करीत वातावरण तापवायला सुरुवात केली आहे.

Leave a Comment