सचिनने निवृत्त व्हावे: इम्रान खान

नवी दिल्ली: भारताचा विक्रमादित्य फलंदाज सचिन तेंडूलकर याने कारकीर्दीच्या शिखरावर असतानाच निवृत्ती घ्यावी आणि स्वत:वर निवड समितीच्या कृपेवर अवलंबून राहण्याची वेळ येऊ देऊ नये; अशी स्पष्टोक्ती पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान यांनी केली आहे.

न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत सलग ३ वेळा त्रिफळा उडल्यावर सचिनवर निवृत्तीसाठी दबाव वाढू लागला आहे. इम्रानसारख्या ज्येष्ठ खेळाडूच्या या मतामुळे त्यात भर पडली आहे.

सचिनच्या नावावर सर्वाधिक विक्रमांची नोंद आहे. देशासाठी मोठी कामगिरी करून जगभरातील रसिकांना त्याने मुक्तहस्ताने क्रिकेटचा आनंद दिला आहे. आता अजून त्याला काय हवे आहे; असा सवाल करीत; मी त्याच्या जागेवर असतो तर कारकीर्दीच्या या टप्प्यावर आनंदाने निवृत्त झालो असतो; अशी टिपण्णीही इम्रान यांनी केली. जसे वय वाढत जाते; तसे आपले शरिर आपल्या क्षमतांना न्याय देऊ शकत नाही याची जाणीव सचिनने ठेवावी; असा सल्लाही इम्रान यांनी दिला.

सचिनला निवड समितीच्या कृपेवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे काय; असे विचारले असता इम्रान यांनी; तशी वेळ येण्याची वाटच का बघावी; असा सवाल केला.

Leave a Comment