बालमृत्यूत भारत ‘अव्वल’

न्यूयॉर्क: भारत ही जगातील महासत्ता होण्याची भाषा सातत्याने करणार्‍यांना विचार करायला लावणारी आकडेवारी युनिसेफच्या अहवालातून समोर आली आहे. युनिसेफच्या बालमृत्यू अहवाल २०१२ नुसार जगातील बालमृत्यूपैकी तब्बल ५० टक्के बालमृत्यू केवळ ५ देशांमध्ये होतात. या पाच देशात पहिला क्रमांक भारताचा आहे; तर पाचव्या क्रमांकावर आहे अमेरिकेसह जगावर डोळे वटारणारा चीन!

जगात दर दिवशी पाच वर्षाखालच्या तब्बल १९००० हजार बालकांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक आकडेवारी या अहवालात पुढे आली आहे. सन २०११ या वर्षात भारतात १६ लाख ५५ हजार बालकांचा मृत्यू झाला असून हा आकडा जगात सर्वाधिक आहे. त्याखालोखाल नायजेरियामध्ये ७ लाख ५६ हजार, कांगो ४ लाख ६५ हजार, पाकिस्तान ३ लाख ५२ हजार आणि चीनमध्ये २ लाख ४९ हजार बालकांचा मृत्यू झाला आहे. जगातील बालमृत्यूपैकी निम्मे बालमृत्यू या ५ देशातच झाले आहेत.

जगात होणार्‍या बालमृत्यूपैकी १/३ बालमृत्यू कुपोषणाने होतात. याशिवाय न्यूमोनिया (१८ टक्के), मुदतपूर्व प्रसूती (१४ टक्के), अपचन व जुलाब (११ टक्के), इन्ट्रापार्टम विकार (९ टक्के) आणि मरेलिया (७ टक्के) ही बालमृत्यूची ५ प्रमुख करणे आहेत; असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Comment