नरेंद्र मोदी दहशतवाद्यांच्या रडारवर

अहमदाबाद: गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांकडून धोका असल्याचा इशारा केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी गुजरात पोलिसांना दिला आहे. त्यामुळे सध्या विवेकानंद यात्रेच्या दौर्‍यावर असलेल्या मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली आहे.

मोदी यांची कट्टर हिंदुत्ववादी आणि मुस्लीम विरोधी अशी प्रतिमा असल्याने मोदी हे लष्करच्या रडारवर आहेत. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांची धांदल सुरू असतानांच ४ ते ५ दहशतवादी राज्यात घुसले असून राज्यात दहशतवादी हल्ले करण्याची त्यांची योजना आहे. मुख्यमंत्री मोदी यांच्यावर हल्ला करण्याचेही त्यांचे नियोजन आहे. सुमारे एक महिन्यापासून दहशतवादी राज्यात घातपात करण्याची तयारी करीत आहेत; अशी माहिती केंद्रीय गुप्तचर विभागाने राज्य पोलिसांना दिली आहे.

आगामी दोन महिन्यात होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा मतदारांना आकृष्ट करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विवेकानंद यात्रेदरम्यान दहशतवादी हल्ला होऊ शकतो; या गुप्तचरांच्या या इशार्‍यानुसार मोदी यांची सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे.

Leave a Comment