कसाबला फाशी देण्याची इच्छा अखेर अधुरीच

पुणे दि.१३- येरवडा कारागृहात फाशी मॅन म्हणून कार्यरत असलेले अर्जुन जाधव यांचे सोमवारी सोलापूर येथील रूग्णालयात निधन झाले असून मुंबई हल्ल्यातील गुन्हेगार अजमल कसाब याला फाशी देण्याची त्यांची इच्छा अखेर अधुरीच राहिली.

पुण्याच्या येरवडा कारागृहात जल्लाद म्हणून काम करणारे जाधव निवृत्त झाले १९९६ साली. मात्र निवृत्तीनंतरही मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील कसाब याला फाशी देण्याची त्यांची तयारी होती. ३३ वर्षांच्या आपल्या सेवेत त्यांनी १०१ जणांना फासावर लटकविले होते. मे २०१० ला एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कसाबला फाशी देण्याची इच्छा व्यक्त केली होती. अर्धांगवायूचा झटका आल्याने त्यांना अपंगत्व आले होते. मात्र तरीही कसाब सारख्याला फाशी देण्यासाठी आपल्या मनाची आणि शरीराची पूर्ण तयारी आहे असे त्यांनी सांगितले होते.

पुण्याच्या येरवडा जेलमध्येच त्यांनी त्यांच्या कारकीर्दीतील शेवटची फाशी दिली होती. गरीबीत राहणार्‍या जाधव यांना सतत धमक्या येत असत तसेच जनरल अरूणकुमार वैद्यांचे हत्यारे सुखा व जिदाला फाशी दिल्यानंतर कांही दहशतवादी त्यांची चौकशी करत सोलापूरात पोहोचले होते असेही त्यांनी मुलाखतीत सांगितले होते. सरकारने त्यांना त्यांच्या  कार्याबद्दल घर व जमीन देण्याचे आश्वासन दिले होते मात्र ते पुरे केले गेले नाही. पेन्शन आणण्यासाठी जातानाही त्यांच्या सोबत साध्या वेशातील पोलिस असत.

कसाबला फाशीची शिक्षा सुनावली गेल्यानंतर सरकारला आपल्या मदतीची गरज लागेल व त्यावेळी आपण तयार असले पाहिजे अशीच त्यांची मनोधारणा होती असे त्यांची मुलगी दुर्गा हिने सांगितले. फाशीचा दोर स्वतःच तयार करायचा त्याला साबण आणि लोणी लावून तो गुळगुळीत करायचा ही त्यांचीच कामे होती शिवाय या दोराचे काळजीपूर्वक संरक्षण करणे हेही त्यांचेच काम होते आणि देशप्रेमासाठी हे काम त्यांनी शेवटपर्यंत चोख बजावले होते.

फाशी दिल्यानंतर कधीच कुठली स्वप्ने पडली नाहीत असे सांगताना जाधव यांनी हातात बळ नसले तरी चालते पण मन आणि शरीर खंबीर हवे असेही सांगितले होते. निवृत्तीनंतर ते सोलापूर जिल्ह्यातील आपल्या गांवीच वास्तव्यास होते.

Leave a Comment