कलमाडींना न्यायालयाचा झटका

नवी दिल्ली: राष्ट्रकुल घोटाळ्यात सहभागाचा ठपका असलेले खासदार सुरेश कलमाडी यांना आता ‘खेळा’तील राजकारणापासून दूर राहावे लागणार आहे. कलमाडी यांना यापुढे भारतीय ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक लढविता येणार नाही; असा निर्वाळा दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. राष्ट्रकुल घोटाळ्याबाबत तिहारची वारी घडलेल्या कलमाडी यांना हा दुसरा झटका आहे.

भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणूक प्रक्रियेबाबत राहुल मेहेरा यांनी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी कार्यकारी मुख्य न्यायाधीश ए. के. सिकरी आणि न्या. राजीव सहाय यांच्या खंडपीठासमोर झाली.

भारतीय ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक क्रीडा नियमावलीनुसारच व्हावी; असे आदेश खंडपीठाने यावेळी दिले. क्रीडा नियमावलीनुसार कोणत्याही व्यक्तीला जास्तीत जास्त ३ वेळा ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढता येईल आणि जास्तीत जास्त १२ वर्ष अध्यक्ष पदावर राहता येईल. कलमाडी हे मागील १८ वर्ष ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे कलमाडी यांना यापुढे अध्यक्षपदाची निवडणूक लढविता येणार नाही; असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment