कंदाहार विमान अपहरणातील संशयित गजाआड

जम्मू: एअर इंडियाच्या कंदाहार विमान अपहरण प्रकरणातील संशयित आरोपी आणि कुख्यात दहशतवादी मौलाना मसूद अजहरचा उजवा हात समजला जाणारा मेहराजुद्दिन उर्फ जावेद याला किश्तवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी जेरबंद केले.

इंडियन एअरलाईन्सच्या आयसी ८१४ या विमानाचे दहशतवाद्यांनी २४ डिसेंबर १९९९ रोजी काठमांडू येथे अपहरण करून ते अमृतसर मार्गे कंदाहार येथे नेले. या विमानातील एका प्रवाशाची हत्याही अपहरणकर्त्यांनी केली. विमानातील अन्य १८९ प्रवाशांची सुटका करण्याच्या बदल्यात तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे मंत्री जसवंत सिंह यांनी स्वत: जैश ए महंमदचा प्रमुख मौलाना मसूद, अहमद जरगर आणि शेख अहमद उमर सईद या खतरनाक दहशतवाद्यांना खास विमानाने कंदाहारला नेऊन त्यांची सुटका केली होती. या अपहरण खटल्यात तिघा दहशतवाद्यांना आजन्म कारावासाची शिक्षाही न्यायालयाने सुनावली आहे.

याच अपहरण प्रकरणी जावेद यानेही कटात सहभागी होऊन मदत केल्याचा पोलिसांचा कयास आहे.
जावेद हा मूळचा काश्मीरचा असून सन १९९२ मध्ये त्याने पाकिस्तानात जाऊन दहशतवादी कृत्यांचे प्रशिक्षण घेतले. हा कुख्यात दहशतवादी नेपाळ हद्दीतून किश्तवाड येथे येणार असल्याची गुप्त माहिती जम्मू काश्मीर पोलिसांना मिळाली. त्यानुसार बुधवारी रात्री सापळा रचून पोलिसांनी त्याला अटक केली.

Leave a Comment