ओसामा हल्लाप्रकरणात नवीन वादाला तोंड

पाकिस्तानातील अबोटाबाद येथे रात्रीच्या वेळी शिरून अलकायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याची अमेरिकेच्या सील कमांडोनी केलेली हत्या सार्‍या जगात आश्चर्य आणि कौतुकाचा विषय बनली असतानाच या कारवाईत सामील असलेल्या सील कमांडोच्या आत्मचरित्रामुळे दररोज नव्या वादाला तोंड फुटत असल्याचेही दिसून येत आहे.

सील कमांडो मॅट बिसोनेट याने टोपणनावाने लिहिलेल्या नो इझी डे या आत्मचरित्रात्मक पुस्तकात ओसामाच्या हत्त्येसंदर्भातील अनेक महत्त्वाच्या व आजपर्यंत जगासमोर न आलेल्या अनेक बाबींच्या उल्लेख आहे. ओसामाला अगोदरच गोळी लागली होती अशी माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.तसेच अमेरिकेच्या एमएच -४७ या दोन हेलिकॉप्टर्सनी अफगाणिस्तानातील जलालाबाद येथून उड्डाण भरून पाकिस्तानात जाताना भारताची हवाई हद्द ओलांडली होती का या विषयी आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. या पुस्तकात या दोन हेलिकॉप्टर्सचा हवाईमार्गाचा नकाशा दिला आहे. पाकिस्तानची पूर्व सीमा ओलांडून ही चॉपर्स गेली असल्याचे त्यात दाखविण्यात आले आहे. मात्र भारतीय हवाई हद्दीतून गेल्याशिवाय असा प्रवास करणे या चॉपर्सना शक्य नाही असे तज्ञांचे म्हणणे आहे.

अमेरिकेतील लोकप्रिय वेबसाईट रेडस्टेट वरून या विषयीच्या वादाला खास रंग चढला आहे. भारतीय हवाई हद्द ओलांडताना त्यांची पूर्व परवानगी घेतली होती का व तशी घेतली असेल तर भारताला या कारवाईची माहिती अगोदरच दिली गेली असली पाहिजे असाही सूर लावण्यात आला आहे. परवानगी घेतली नसेल तर भारताचा हवाई हद्दीचा भंग केला गेला आहे आणि तो गुन्हा आहे असेही म्हटले जात आहे.

भारतीय वायूसेनेच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी मात्र भारतीय हवाई हद्दीचा भंग झाला नसल्याचा तसेच भारताला या कारवाईची कल्पना नव्हती असा खुलासा केला आहे. सुरक्षा तज्ञ व रॉ चे निवृत्त अधिकारी बी. रमण यांच्या मते अशा प्रकारची कारवाई करताना मिसाईलचा वापरही करावा लागला आहे त्यामुळे अमेरिकेला भारतीय हवाई हद्द भंग पेक्षाही पाकिस्तानला ही कारवाई लक्षात येईल काय याचीच अधिक चिता असावी. त्यात आणखी एक धोका असाही आहे की भारताच्या बाजूने विमाने येऊन कारवाई झाली याचा अर्थ या कारवाईत भारताचाच हात असावा अशी शंका पाकिस्तानने घेतली असती आणि तसे घडले असते तर मात्र या दोन अणुसज्ज देशांत युद्धाची ठिगणी पडली असती हे नक्की.

Leave a Comment