एसटीला मिळणार टोलमधून सुटका

मुंबई: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना टोलमधून सूट मिळावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या मागणीस तत्वत: मजुरी दिली असल्याचा दावा मनसेच्या सूत्रांनी केला. एसटी कर्मचार्‍यांच्या नियोजित संपाला पक्षाचा तीव्र विरोध असल्याचेही त्यांनी सांगितले.

एसटी कामगारांच्या वेतनवाढीचा करार ६ महिन्यात करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दि. २५ मार्च रोजी दिले होते. ही मुदत सप्टेंबर महिन्यात संपत असून एसटीची आर्थिक स्थिती नाजूक असल्याच्या नावाखाली अद्याप त्याबाबत कोणतीही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ मान्यताप्राप्त कामगार संघटनांनी दि. १७ रोजी संपाची हाक दिली आहे. या संपाची दखल न घेतल्यास गणपती उत्सव अथवा दिवाळीच्या काळात अचानक संप करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. या संपाला मनसेचा विरोध आहे.

एसटी मान्यताप्राप्त कामगार संघटना एसटी कामगारांची फसवणूक करीत असल्याचा आरोप करून याबाबत मनसेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत संप रोखण्याबरोबरच एसटीला टोल मधून वगळण्याची चर्चा करण्यात आली.

Leave a Comment