सॅमसंगची चीनमध्ये प्रचंड गुंतवणूक

सोल दि.१३ – दक्षिण कोरियातील बलाढ्य सॅमसंग इलेक्ट्रोनिक्सने चीनमधील झियान शहरात चीप प्लांटसाठी सात बिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली असून चीनमधील ही त्यांची सर्वाधिक मोठी गुंतवणूक आहे. २०१४ पासून या कारखान्यातील उत्पादन सुरू होणे अपेक्षित आहे.

या कारखान्यात अॅडव्हान्स १० नॅनोमीटर क्लास फ्लॅश मेमरी चीपचे उत्पादन केले जाणार आहे. स्मार्टफोन्स व संगणकात या चीप वापरल्या जातात. सॅमसंग जगातील सर्वात मोठी चीपमेकर कंपनीही आहे. चीनमधील उत्पादन सुरू झाल्यानंतर जगभरातील कंपनीची पुरवठा चेन अधिक क्षमतेने कार्यरत होणार असल्याचे कंपनीच्या अधिकार्‍यांनी म्हणणे आहे. सॅमसंग स्मार्टफोन पासून ते टॅब्लेट पीसी पर्यंत अनेक उत्पादने करत असून त्यांच्या चीप्स अन्य आय.टी. कंपन्यांनाही पुरविल्या जातात. अगदी प्रतिस्पर्धी अॅपल आणि नोकिया या कंपन्यांनाही या चीप्स पुरविल्या जातात.

चीनमध्ये कंपनी स्थापल्यामुळे मोठा संशोधक वर्ग उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली असून या भागातील ३७ विद्यापीठे आणि ३ हजार संशोधन केंद्रे यातून चांगले संशोधक मिळतील अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. सॅमसंग एनएएनडी फ्लॅश मेमरी उत्पादनात मार्केट लिडर असून त्यांचा या बाजारपेठेतील हिस्सा ३७.४ टक्के इतका आहे. त्या खालोखाल जपानची तोशिबा आणि अमेरिकेच्या मायक्रॉन या कंपनीचा नंबर लागतो.

Leave a Comment