ट्रॅव्हल आणि टूरिझम

हा व्यवसाय वेगाने वाढत आहे. देशी आणि परदेशी  पर्यटकांना त्यांच्या टूरचे नीट नियोजन करणारे व्यावसायिक हवे आहेत. जे त्यांना नवे काही तरी दाखवतील आणि त्यांची ट्रिप सुखाने समाधानाने पार पडेल अशी व्यवस्था करतील.भारतात गतवर्षी ३९ लाखावर परदेशी पर्यटक आले होते. ही संख्या पाहिली  म्हणजे या व्यवसायात किती रोजगार संधी आहेत याचा अंदाज येतो.

ट्रॅव्हल एजन्सीज, हॉटेल, गाईड, हवाई प्रवासाची सोय करणारे एजंट इत्यादी अनेक रोजगार आणि व्यवसाय अक्षरश: प्रचंड वेगाने फोफावत आहेत. यातल्या काही नोकर्‍या तर मुलींसाठीही आहेत. लोकांना भेटायला आणि त्यांच्याशी बोलायला आवडते अशा लोकांना ही संधी चांगली आहे. पर्यटकांना बँकिंगचीही सोय आवश्यक असते आणि बँका त्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करीत असतात. त्याचाच एक भाग म्हणून बँकांनी आपल्या सेवांना पर्यटक सेवा जोडली आहे. त्यामुळे या व्यवसायात शिरणार्‍या तरुणांना बँकेचीही नोकरी मिळू शकते. आपल्या देशात आता ट्रॅव्हल एजन्सीचा व्यवसाय चांगलाच मूळ धरायला लागला आहे. त्याचा विचार करून काही शिक्षण संस्थांनी या संबंधातले डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू केले आहेत. 

हे अभ्यासक्रम तीन ते चार महिन्यांचे असतात. आपल्या परिसराचा नकाशा वाचायची आवड आणि जनसंपर्काची हातोटी या जोरावर या शिक्षणाच्या मदतीने कोणीही यशस्वी होऊ शकतो. पर्यटकांना प्रत्यक्षात हव्या त्या ठिकाणी नेणे, तिथे त्यांच्या व्यवस्था करणे आणि प्रेक्षणीय स्थळांच्या त्यांच्या भेटी सोप्या होतील याची व्यवस्था करणे ही कामे टूर ऑपरेटर्स करीत असतात. ही कामे हंगामी असतात. प्रेक्षणीय ठिकाणी गाईड असतात. हीही एक चांगली रोजगार संधी आहे. त्यांना सरकारतर्फे परवाने दिले जात असतात हॉलीडे कन्सल्टंट हाही याच धर्तीचा एक व्यवसाय आहे. या क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रमांची सोय आता बहुतेक सार्‍या विद्यापीठांतून केली जात आहे. मुंबई, गोवा, पुणे या विद्यापीठात हे अभ्यासक्रम आहेत. काही विद्यापीठांत तर पदव्युत्तर पदवीचीही सोय आहे.  औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तर टूरिझमचा फार जुना अभ्यासक्रम आहे. औरंगाबादला असलेल्या पर्यटक आकर्षणाचा विचार करून तो तिथे सुरू करण्यात आलेला आहे. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या स्कूल ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेत पत्राद्वारे पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम पुरा करण्याची सोय करण्यात आली आहे. पत्ता आहे.  मैदान गढी, नवी दिल्ली ११० ०६८.