‘अमूल’ करणार ३ हजार कोटीची गुंतवणूक

नवी दिल्ली: ‘अमूल’ अर्थात श्वेतक्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरियन यांचे लाडके अपत्य असलेली गुजरात सहकारी दुग्ध विपणन फेडरेशन पुढच्या ५ वर्षात दुग्धोत्पादनात ३ हजार कोटी रुपयांची भरीव गुंतवणूक करणार असून देशात ९ मोठे दुग्धजन्य उत्पादन प्रकल्प उभारले जाणार आहेत; अशी माहिती फेडरेशनचे कार्यकारी संचालक आर. एस. सोधी यांनी दिली.

अमूलने बाजारपेठेत आणलेल्या अमूल मोती या नव्या उत्पादनाच्या अनावरण कार्यक्रमानंतर ते पत्रकारांची बोलत होते. अमूल मोती हे प्रक्रिया केलेले दूध असून ते तीन महिन्यांपर्यंत टिकून राहू शकते. त्यामुळे त्याची किंमत सामान्य दुधापेक्षा दुप्पट ठेवण्यात आली आहे.

फेडरेशनच्या हरियानामधील प्रकल्पाचे काम सुरू असून हा प्रकल्प नोव्हेंबर महिन्यात पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार असल्याचे सांगून सोधी यावेळी म्हणाले की; मुंबई, कोलकाता या ठिकाणी प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. रोहटक येथेही नवा प्रकल्प उभारला जाणार आहे. ज्या ठिकाणी सध्या दुधाचे उत्पादन कमी आहे; अशा ठिकाणी प्रकल्प उभारून दूध उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचे कंपनीचे धोरण आहे. सध्याच्या प्रकल्पांची क्षमताही ५० टक्क्यांनी वाढविली जाणार आहे.

Leave a Comment