संशोधकांना उलगडली निसर्गाची रंगकिमया

हजारो शेकडो वर्षांपूर्वीच्या वनस्पती, फळे, फुले जतन केल्यानंतर त्यांच्यावरचे रंग कायम कसे टिकतात, निसर्गाची ही काय किमया असेल याचा शोध घेण्याच्या संशोधकांच्या प्रयत्नांना यश आले असून हे रंग कायम टिकविणारे पदार्थ कसे वापरले जातात यामागचे तंत्रज्ञान त्यांना उलगडले आहे. त्यामुळे हेच तंत्रज्ञान वापरून आता अन्नपदार्थांना रंगीबेरंगी करण्याबरोबरच चलनी नोंटांवरील छपाईतील रंगापर्यंत त्यांचा वापर करता येणे शक्य होणार आहे.

निसर्गातील रंग म्हणजे फुलपाखरे, मोराची पिसे, निरनिराळी फुले, फळे, वनस्पती यांचे चमकदार रंग. मोरपिस आणि फुलपाखरांच्या पंखांवरचे रंग तर अगदी भुरळ घालणारे. हा गडद निळा रंग एका विशिष्ठ झाडापासूनही मिळविता येतो असे संशोधकांना आढळले आहे. निसर्गातील रंग म्हणजे सेल्यूलोजचे वेगवेगळे थरच असतात असे लंडनच्या केंब्रिज विद्यापीठातील संशोधक सिल्व्हिया व्हिग्लोलिनी यांना आढळले. निसर्ग रंगापासून स्फूर्ती घेऊन त्यांनी संशोधन सुरू ठेवले तेव्हा विपुल प्रमाणात उपलब्ध असलेल्या या सेल्युलोजपासून अनेक कायम स्वरूपी टिकणारे चमकदार रंग तयार करता येतात हे त्यांच्या लक्षात आले.

सिल्व्हियाच्या मते अनेक फळे फारशी चवीला चांगली नसूनही पक्षी त्यांकडे आकर्षित होतात त्यामागे या फळांचे आकर्षक रंगच कारणीभूत असतात हे लक्षात आले. तेव्हा अन्नपदार्थांना आकर्षक बनविण्यासाठी वापरल्या जाणार्‍या कृत्रिम विषारी रंगापेक्षा असे नैसर्गिक रंग बनविणे अधिक योग्य असल्याचे जाणवले. सेल्युलोज खाण्यायोग्य आहे. या सेल्युलोजचे एकावर एक थर ज्याप्रमाणात असतील त्या प्रमाणात वेगवेगळ्या वेवलेंथ विविध रंग परावर्तित करतात. पेपर उद्योगातही या रंगाचा वापर करता येतो तसेच सौंदर्य प्रसाधने बनवितानाही ते उपयुक्त ठरतात असे दिसून आले.

फ्रान्सच्या संशोधकांनी याच विषयावर केलेल्या संशोधनातून तयार केलेले रंग लोरियाल या सौंदर्यप्रसाधन कंपनीने वापरले आहेत तर बीएमडब्ल्यू या जागतिक कीर्तीच्या वाहन उद्योगानेही वेगवेगळ्या कोनातून पाहिल्यास वेगवेगळ्या रंगाची दिसणारी कार रंगवून पाहिली आहे. त्यासाठीही याच तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. फक्त या रंगांचे उत्पादन करण्यात असणारी आव्हाने थोडी अधिक सोपी झाली की हे नैसर्गिक, बिनविषारी, कायम टिकणारे सदाबहार रंग मानवजातीसाठी सहज आणि स्वस्तात उपलब्ध होतील असा विश्वास सिल्व्हियाने व्यक्त केला आहे.

Leave a Comment