मराठी नंबरप्लेटच्या वाहनांना आजपासून दंड

पुणे दि.११- ज्या वाहनमालकांनी आपल्या वाहनांवर देवनागरी लिपीतून नंबर प्लेट लावल्या आहेत, त्यांच्यावर आजपासून कारवाई करण्यात येणार आहे. अशा वाहनांना दंड आकारण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिस विभाग अधिकार्‍यांनी सांगितले.

केंद्रीय मोटर वाहन कायदा १९८९ च्या ५० व्या कलमाप्रमाणे सर्व वाहनांच्या नंबरप्लेट इंग्रजी भाषेतच असणे बंधनकारक आहे. त्यामुळे रोमन आकड्यांशिवाय अन्य कोणत्याही भाषेतील नंबरप्लेट अवैध मानल्या जातात. आजपर्यंत देवनागरीत पण फॅ न्सी नंबरप्लेट लावणार्‍यांविरोधात कारवाई करून त्यांना दंड आकारला जात होता मात्र आजपासून देवनागरी आकड्यांतील नंबरप्लेट लावलेल्या वाहनांवरही कारवाई केली जाणार आहे. फॅन्सी नंबरप्लेट लावलेल्या २६८५२ वाहनांवर जानेवारी ते ऑगस्टपर्यंत केलेल्या कारवाईत २८ लाख ५० हजारांचा दंड वसुल केला गेला आहे.

वाहतूक विभागाचे उपायुक्त विश्वास पांढरे याविषयी अधिक माहिती देताना म्हणाले की कायद्यानुसार रोमन आकड्यांतच नंबरप्लेट असल्या पाहिजेत.मात्र आजकाल अनेक वाहनमालक देवनागरी आकड्यांत नंबरप्लेट लावतात. कांही नंबर तर दादा काका, पवार अशा अक्षरांशी साधर्म्य दाखविणार्‍या आहेत त्यांना फॅ न्सी नंबरप्लेट म्हटले जाते. पोलिसांना अशा नंबरप्लेट वाचणे अवघड जाते ही एक बाब. पण समजा अन्य कोणत्या राज्यात अशा वाहनांना अपघात झाले तर तेथील स्थानिक पोलिसांना नंबरप्लेटवरून वाहनाचे रजिस्ट्रेशन शोधून काढण्यात अडचणी येतात. त्यामुळे देशभर रोमन आकड्यांतीलच नंबरप्लेट लावणे बंधनकारक आहे. या प्लेट वाहनाच्या पुढे आणि मागे ठराविक जागीच लावणेही बंधनकारक आहे. तिचाकी अथवा चारचाकी वाहने या दोन जागा व्यतिरिक्त अन्यत्र देवनागरी नंबरप्लेट लावू शकतील.

पुण्यातील नंबरप्लेट बनविणार्‍यांनाही वाहतूक पोलिसांकडून सूचना देण्यात आल्या आहेतच. मात्र तरीही त्यांनी तशा प्लेट बनविल्या तर त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे असे सांगून पांढरे म्हणाले की आता गणपती तोंडावर आले आहेत. पुण्यात नुकतेच घडलेले बॉम्बस्फोट आणि गणपती उत्सवाचा फायदा घेऊन दहशतवादी हल्ल्यांची असलेली भीती लक्षात घेऊन पोलिसांनी अन्य राज्यांतील वाहनांवरही लक्ष केंद्रीत केले आहे. ज्या वाहनचालकांकडे वाहनाची पुरेशी कागदपत्रे नसतील त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. अर्थात पोलिस प्रत्यक्षात ही कारवाई करणार नाहीत तर संबंधित वाहनांची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयांकडे पाठविली जाईल आणि ते पुढील कारवाई करतील.

Leave a Comment